‘१६ इनसायडर’ आंतरभारती प्रेरणा जागविणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:07+5:302021-02-05T05:19:07+5:30
पुणे : देशाच्या प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन पेज पब्लिकेशन’ प्रकाशित ‘१६ इनसायडर’ या द्विभाषिक कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य ...

‘१६ इनसायडर’ आंतरभारती प्रेरणा जागविणारा
पुणे : देशाच्या प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन पेज पब्लिकेशन’ प्रकाशित ‘१६ इनसायडर’ या द्विभाषिक कवितासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले.
या वेळी ज्येष्ठ कवी हेमंत जोगळेकर, मनोहर सोनवणे, प्रकाशक अमृता खेतमर आणि प्रदीप खेतमर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, ‘इनसाईडर’ हा मराठीतील आजच्या सुमारे डझनभर उत्तम कवींच्या निवडक कवितांचा द्विभाषिक काव्यसंग्रह-मूळ मराठी कविता व तिचा सरस व मराठी सांस्कृतिक संदर्भ जपत केलेला इंग्रजी अनुवाद असा काव्यसंग्रह प्रसिद्ध होणे ही केवळ मराठीच नाही तर भारतीय साहित्यातील एक अपूर्व घटना आहे. भारत हा बहुभाषिक व बहुसांस्कृतिक देश आहे व इतर भाषा व संस्कृती जाणणे व त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे हा साने गुरुजींच्या आंतर भारतीचा विचार ‘इनसायडर’द्वारे अमलात येत आहे.
अमृता खेतमर म्हणाल्या की, ‘१६ इनसायडर’च्या दुसऱ्या भागानंतर भारतातील विविध भाषांना घेऊन हा उपक्रम आंतरभारती स्तरावर आणखी व्यापक करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. या वेळी लक्ष्मीकांत देशमुख, हेमंत जोगळेकर आणि मनोहर सोनावणे यांनी कवितावाचन केले. प्रदीप खेतमर यांनी आभार मानले.
अमेरिकेतील ‘शब्दमित्र’ या सांस्कृतिक कलामंचाने कवितासंग्रहातील मराठी-इंग्रजी कवितांचे अभिवाचन करण्याविषयी उत्सुक असल्याचे नीरज कुलकर्णी, जाई छत्रे, सौरभ वसेकर यांनी कळविले आहे. लवकरच अमेरिकेतून त्या कार्यक्रमाचे प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती अमृता खेतमर यांनी दिली.
.....