- नारायण बडगुजर
पिंपरी : देशात तसेच परदेशात सहलीकरिता अत्यंत कमी दरात पॅकेज देतो, असे सांगत अनेकांची १४ लाख ९५ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे ऑक्टोबर २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडली.
ताथवडे येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वीवीयन अविनाश मकवाना (रा. पौड, ता. मुळशी, जि. पुणे), अभिषेक कांबळे, सलमान पठाण, बिलाल शेख, इम्तियाज शेख आणि एक संशयित महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी आपसांत संगनमत करून फिर्यादी व इतरांना संशयितांच्या रेडिएसन हॉस्पिटलीटी मॅनेजमेंट ॲण्ड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमध्ये येण्यासाठी कुपन दिले. कुपनवर बक्षीस लागल्याचे सांगून बक्षीस घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले. कंपनीचा देशात व परदेशात सहलीसाठीचा एक, दोन व तीन वर्षाचा प्लॅन सांगितला.अत्यंत कमी दरात थ्री आणि फोर स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, त्यामध्ये एक वेळेचा नाश्ता व एक वेळचे जेवण, तसेच प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या चित्रपटाची आठ तिकिटे, वर्षातून दोनवेळा जेवण दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादी जाधव यांच्याकडून गुंतवणूक स्वरूपात दोन लाख ७५ हजार रुपये तसेच इतरांकडून १२ लाख २२ हजार ३६४ रुपये असे एकूण १४ लाख ९७ हजार ३६४ रुपये घेऊन फसवणूक केली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल लोहार तपास करीत आहेत.