वीर धरण १०० टक्के भरल्याने १३ हजार ९११ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:23 IST2018-08-16T23:34:09+5:302018-08-17T00:23:08+5:30
नीरा देवघर, भाटघर तसेच गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून, वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाले.

वीर धरण १०० टक्के भरल्याने १३ हजार ९११ क्युसेक्सने नीरा नदीत पाणी सोडले
नीरा - नीरा देवघर, भाटघर तसेच गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून, वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाले. धरण १०० टक्के भरल्याने धरणातून १३ हजार ९११ क्युसेक्स वेगाने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले असून, नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नीरामाई दुथडी भरून वाहत असून, नीरा (ता.पुरंदर) येथील ब्रिटिशकालीन पुलावर तसेच प्रसिद्ध दत्तघाटाच्या पायऱ्यांना पाणी लागल्याने नदीच्या खळाळत्या प्रवाहाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नीरा व परिसरातील नागरिक येत आहेत.
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला त्यामुळे गुंजवणी, नीरा देवघर तसेच भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला, मात्र इतर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली. नीरा नदीपात्रातून पाणी वाहत असून, यामुळे पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा डावा व उजवा कालवा तसेच नदीपात्राच्या कडेच्या पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून, यामुळे भूजल पातळीत वाढ होणार आहे. चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिके आदींना पावसाचा तसेच नदीच्या पाण्याचा फायदा होणार आहे. यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार असून, नदीवर बांधलेल्या बंधाºयातही पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नीरामाईची ओटी तसेच पूजनाला महिलांनी सुरुवात केली असून, पीकपाणी चांगले येऊन बरकत मिळण्याची प्रार्थना केली जात आहे.
पोलिसांचे हवे लक्ष
नीरा दुथडी भरून वाहत असून, हे दृश्य टिपण्यासाठी अनेक जण पुलावर येत आहेत. मात्र सेल्फी तसेच फोटोग्राफीच्या नादात एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणाई येथे मोठ्या प्रमाणावर येत असून त्यांच्या हालचालींकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
या आठवड्यात वीर धरणातून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग दोन वेळा करण्यात आला. आज गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नीरा देवघर धरणातून ७९३७ क्युसेक्स, भाटघर धरणातून २३२९ क्युसेक्स तर वीर धरणातून १३९११ क्युसेक्स वेगाने रात्रभर पाणी सोडण्यात येणार आहे.