दौंड-पुणे पॅसेंजरमधील १३ महिला प्रवाशांना अटक व दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:05 IST2018-07-09T21:56:35+5:302018-07-09T22:05:34+5:30
या महिलांना आंदोलन करणे आणि अनधिकृतपणे चेन ओढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आले.

दौंड-पुणे पॅसेंजरमधील १३ महिला प्रवाशांना अटक व दंड
पुणे : दौंड-पुणे पॅसेंजरला घोरपडी येथे थांबा द्यावा या मागणीसाठी चेन ओढून गाडी थांबविल्याप्रकरणी सोमवारी (दि. ९) १३ महिला प्रवाशांना अटक करण्यात आले. रेल्वे न्यायालयाने यातील १२ महिलांना ४०० व एका महिलेला ५०० रुपये दंड ठोठावला.
दौंड स्थानकातून सकाळी ७.०५ वाजता सुटणाऱ्या पॅसेंजरने या महिला प्रवास करत होत्या. ही गाडी घोरपडी यार्डात आल्यानंतर काही महिलांनी अचानक चेन ओढून गाडी थांबविली. तसेच त्यानंतर या १३ महिलांनी गाडीच्या इंजिनसमोर उभे राहून आंदोलन केले. या प्रकारामुळे गाडी पुढे जाण्यास खुप विलंब झाला. तसेच पॅसेंजरमागील अन्य सहा गाड्यांनाही विनाकारण उशीर होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना रेल्वे अधिनियमातील विविध कलमांअंतर्गत आंदोलन करणे आणि अनधिकृतपणे चेन ओढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आले. या महिलांना नंतर रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १२ महिलांना ४०० रुपये तर एका महिलेवर ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
गाड्या वेळेत चालविण्यासाठी रेल्वेकडून खुप प्रयत्न केले जातात. पण आंदोलनामुळे गाड्यांच्या वेळेवर परिणाम झाला. हा मार्ग दोन्ही बाजूने व्यस्त असल्याने अपघात होण्याचा धोका असतो. याठिकाणी २०१७-१८ या वर्षात रेल्वेमार्ग ओलांडणाऱ्या २६ नागिरकांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. त्यामुळे प्रवाशांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य न करता रेल्वेला वेळेत गाड्या चालविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
..................
घोरपडी यार्डात कोणत्याही गाडीला थांबा देणे सध्यातरी शक्य नाही. थांबा द्यायचा असल्यास तशा सुविधा निर्माण कराव्या लागतील. त्यामुळे चेन ओढणे, आंदोलन करणे हे चुकीचे आहे. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून इथे उतरतात. त्यामुळे रेल्वेकडून झालेली कारवाई योग्यच आहे.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप