जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी
By Admin | Updated: January 8, 2015 22:56 IST2015-01-08T22:56:08+5:302015-01-08T22:56:08+5:30
खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत.

जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी
पुणे : खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, शेतीच्या पाण्यात कपात न करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतीला तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात खडकवासला कालवा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, राहुल कुल, बाबूराव पाचर्णे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
खडकवासला प्रकल्पातून शेतीबरोबरच प्रामुख्याने पुणे शहरासाठीदेखील पाणीपुरवठा करण्यात येतो. यामुळे कालवा समितीच्या बैठकीत अनेक वेळा शहर विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष पाहायला मिळतो. यावेळी देखील शहरातील लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठ्यात कपात करू नये, असा पवित्रा घेतला. तर ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींनी पाण्यावर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा हक्क असून, पुणेकरांनी अत्यंत काटकसरीने पाणी वापरले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (प्रतिनिधी)
४सध्या धरणात उपलब्ध असलेल्या २०.५४ टीएमसी पाणीसाठ्यातून शेतीसाठी एक रब्बी आणि दोन उन्हाळी आवर्तनासाठी ११.८० टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.
४खडकवासला प्रकल्पातून वरसगाव, पानशेत, खडकवासला व टेमघर या चार धरणांतून जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील सुमारे ६२ हजार १४६ हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येते.
४यामध्ये रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी दोन आवर्तने देण्यात येतात. रब्बी हंगामातील ४५ दिवसांचे एक आवर्तन यापूर्वीच देण्यात आले असून, आता तीन आवर्तनांसाठी ११.८० टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने खडकवासला प्रकल्पात सरासरीपेक्षा ७ ते ८ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांसह शेतकऱ्यांनीदेखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला. यामध्ये शहरातील पाणीगळती थांबविण्यासाठी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्वरित उपाय-योजना करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या. तर, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ड्रीपवर शेती करण्याचा सूचना दिल्या.
८ हजार हेक्टर येणार ओलिताखाली
मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. त्यामुळे शहराचे अथवा शेतीचे पाणी कपात करण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. -वृत्त/८