कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील ११ जणांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2023 10:49 PM2023-04-22T22:49:08+5:302023-04-22T22:49:16+5:30

कॉसमॉस बँकच्या गणेश खिंड रोडवरील मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला होता.

11 sentenced in Cosmos Bank cyber attack | कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील ११ जणांना शिक्षा

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील ११ जणांना शिक्षा

googlenewsNext

पुणे - कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच (सर्व्हर) सायबर हल्ला करून कॉसमॉस बँकेची ९४ कोटी ४२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने बँकेतून पैसे काढणाऱ्या ११ जणांना शिक्षा सुनावली.

फहिम मेहफुज शेख (रा. भिवंडी), फहिम अझीम खान (रा. सिल्लोड, औरंगाबाद), शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (रा. सिल्लोड, औरंगाबाद), महेश साहेबराव राठोड (रा. भोकर, जि. नांदेड), नरेश लक्ष्मीनारायण महाराणा (रा. विरार), मोहम्मद सईद ईक्बाल हुसेन जाफरी ऊर्फ अली (रा. भिवंडी), युस्टेस अगस्टीन वाझ ऊर्फ ॲथोनी (रा. जोगेश्वरी, मुंबई), अब्दुल्ला अफसरअली शेख (रा. मीरा रोड, इस्ट, ठाणे), बशीर अहमद अब्दुल अझीज शेख (रा. भायखळा, मुंबई), सलमान मोहम्मद नईम (रा. मुंब्रा, ठाणे), फिरोज यासीन शेख (रा. काळा चौकी, मुंबई) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

कॉसमॉस बँकच्या गणेश खिंड रोडवरील मुख्यालयात असलेल्या सर्व्हरवर सायबर हल्ला करून सायबर चोरट्यांनी ११ ऑगस्ट २०१८ रोजी बँकेच्या काही व्हिसा व रुपे डेबीट कार्डधारकांची माहिती चोरून, क्लोन व्हिसा डेबिट कार्डद्वारे प्रत्यक्ष एटीएम सेंटरवर जाऊन क्लोन कार्डद्वारे भारताबाहेर ७८ कोटी रुपये व भारतामध्ये क्लोन रुपे डेबिट कार्डद्वारे २ हजार ८४९ व्यवहार करून २ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता स्विफ्ट ट्रान्झेक्शन इनिशिएट करून हँगसेंग बँक हाँगकाँग या बँकेच्या एएलएम ट्रेडिंग, हाँगकाँग यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करून ते काढून घेतले गेले होते.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह, संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केला. लेखनिक म्हणून हवालदार अजित कुर्हे, पोलिस अंमलदार योगेश वाव्हळ यांनी काम पाहिले. सहायक निरीक्षक सागर पानमंद, हवालदार अस्लम अत्तार, संतोष जाधव यांनी तांत्रिक पुरावा गोळा करण्यात मदत केली. विशेष पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, भारती राष्ट्रीय भुगतान निगम, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, गणेशखिंड आणि हाथवे इंटरनेट यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. बोधिनी यांनी व पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक रेणुसे यांनी काम पाहिले.
 

Web Title: 11 sentenced in Cosmos Bank cyber attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.