वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी १० लाखांची लाच; डीनच्या कार्यालयावर शाईफेक, पुण्यात काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:51 AM2023-08-09T11:51:57+5:302023-08-09T11:52:49+5:30
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले
पुणे: पुणे महापालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना अधिष्ठाताला (डीन) रंगेहाथ पकडण्यात आले होते. पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात ही कारवाई करण्यात आली. डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय ५४ वर्ष, डीन (वर्ग-१) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती.
याबाबत आता पुण्यातील अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये काँग्रेसकडून शाई फेक आंदोलन करत काँग्रेसकडून महाविद्यालयाच्या डीनचा निषेध करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि कार्यकर्त्यांनी डीन कार्यालयावर शाई फेकली आहे. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन साठी लाच घेणाऱ्या दिनविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परीक्षा – २०२३ मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महापालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल काेट्यामधून निवड झाली होती. त्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी १६ लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.
दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. या वैद्यकीय महाविद्यालयात सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर तपास करत आहेत.