समाजकल्याणच्या २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार, राज्यात ५६ केंद्रावर दररोज २२ हजार उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा सुरू
By नितीन चौधरी | Updated: March 5, 2025 20:31 IST2025-03-05T20:31:10+5:302025-03-05T20:31:35+5:30
परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी उमेदवारांनी निर्धारित वेळेतच केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

समाजकल्याणच्या २१९ पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवार, राज्यात ५६ केंद्रावर दररोज २२ हजार उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा सुरू
पुणे : समाजकल्याण आयुक्तालयातील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पदांसाठी १ लाख ८७ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी राज्यातील ५६ केंद्रांवर ४ मार्चपासून ऑनलाइन परीक्षा सुरू झाली असून, १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून आले आहे, तसेच उशिराने आलेले अर्जदारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आहे. त्यामुळे परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी उमेदवारांनी निर्धारित वेळेतच केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
ही संगणक आधारित परीक्षा असून, ३ सत्रांमध्ये ती आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील ५६ केंद्रांवर दररोज साधारणपणे २२ हजार उमेदवार परीक्षेस सामोरे जात आहेत. त्यामध्ये वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकांच्या ५ जागांसाठी ११ हजार २१६ अर्ज, गृहपाल, अधीक्षक-६१ जागांसाठी ४० हजार ९६८, गृहपाल, अधीक्षक (महिला) ९२ जागांसाठी ७३ हजार ६२५, समाजकल्याण निरीक्षक ३९ जागांसाठी ५८ हजार ९, उच्च श्रेणी लघुलेखक १० जागांसाठी १ हजार ३१७, निम्म श्रेणी लघुलेखक ३ जागांसाठी ६२० व लघु टंकलेखक ९ जागांसाठी १ हजार ४४७, असे एकूण २१९ जागांसाठी १८७२०२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये ९९ हजार ५०८ महिला अर्जदार असून, ८७ हजार ६५८ पुरुष अर्जदार आहेत, तर ३ हजार ४४८ माजी सैनिक आहेत. दिव्यांग उमेदवाराने स्वत:चा लेखनिक उपलब्ध करावा. समाजकल्याण विभागाकडून लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे विभागाने कळविले आहे.