एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातही पहाटे लव्ह जिहाद झाला, पण...

By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 08:51 AM2020-11-24T08:51:26+5:302020-11-24T08:53:09+5:30

Shiv sena News :

A year ago, there was morning love jihad in Maharashtra too, but ... | एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातही पहाटे लव्ह जिहाद झाला, पण...

एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातही पहाटे लव्ह जिहाद झाला, पण...

googlenewsNext
ठळक मुद्देएक वर्षापूर्वी पहाटे लव्ह जिहाद झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकलेभाजपाने लव्ह जिहादची जी व्याख्या ठरवली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी आणि किती घडली, ते समोर आणावेउगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू नये

मुंबई - सध्या गाजत असलेल्या लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपाला जोरदार टोला लावला आहे. लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपावाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे लव्ह जिहाद झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले आणि टिकले. ते टिकणारच असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, लव्ह जिहादवरून सध्या भाजपाने आदळआपट सुरू केली आहे. हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फूस लावून पळवून नेतात. त्यांचे धर्मांतरण करून निकाह लावतात. हा हिंदुत्वावर आघात आहे. त्याच लव्ह जिहाद असे नाव देण्यात आले. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, जोर होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे संकट, आर्थिक मंदीची लाट हे विषय गंभीर नसून लव्ह जिहाद हेच देशासमोरचे सगळ्यात भयानक संकट आहे आणि महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजपाच्या पुढाऱ्यांनी केली आहे. भाजपाने लव्ह जिहादची जी व्याख्या ठरवली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी आणि किती घडली, ते समोर आणावे, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशात सुरू आहेत. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणे जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करून निकाह लावले जातात. त्या दहशतीला कंटाळून अनेक हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून पळून भारतात आश्रयाला आली आहेत. बांगलादेशातही काही वेगळे सुरू नाही. त्यामुळे लव्ह जिहादविरोधात शस्त्र उचलण्याची गरज तेथे आहे. अर्थात त्या परक्या प्रदेशात जाऊन भाजपा किंवा संघ परिवाराच आंदोलन वगैरे करता येणार नाही. पण केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणी दम भरता येईल. एखादा सर्जिकल स्ट्राइकही करता येईल, असा चिमटा या अग्रलेखातून काढण्यात आला आहे.

शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. मात्र आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनीछाप धार्मिक उन्माद आणि त्यावर तरारलेले राजकारण नाही. लव्ह जिहाद म्हणजे फक्त दोन भिन्न धर्मियांनी एकमेकांशी निकाह लावणे इथपर्यंत मर्यादित आहे काय? खरं सांगायचं तर वैचारिक लव्ह जिहादमुळे देशाचे आणि हिंदुत्वाचे सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे. काश्मिरात पाकनिष्ठ, ३७० कलमप्रेमी मेहबूबा मुफ्तींशी भाजपाने सत्तेचा निकाह लावला हासुद्धा वैचारिक लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? संघमुक्त मोदीमुक्त हिंदुस्तान असा डंका पिटणाऱ्या नितीश कुमारांना पुन्हा कडेवर घेऊन सत्तेचा निकाह लावला हासुद्धा लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये. हिंदुत्वाचे रक्षण सर्वच पातळीवर होणे गरजेचे आहे, असा सल्लाही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली आणि देशाने स्वीकारली, असे होणार नाही. बिहारात भाजपाचे राज्य आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधात कायदा भाजपा करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र सरकारसाठी अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.

 

Web Title: A year ago, there was morning love jihad in Maharashtra too, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.