पिंपरीत महापौरांचा राजीनामा आणि पुण्यात आनंदाच्या उकळ्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:18 IST2018-07-25T18:10:59+5:302018-07-25T18:18:20+5:30
पिंपरीत महापौर बदलणार असेल तर पुण्यातही लवकरच बदलेल या आशेवर असणाऱ्यांना महापौरपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत.

पिंपरीत महापौरांचा राजीनामा आणि पुण्यात आनंदाच्या उकळ्या !
पुणे : राजकारणात कोण कुठल्या संधीचा उपयोग करून घेईल याचा अंदाज बांधणे कायमच कठीण असते. पुण्यातही सध्या अशीच परिस्थिती दिसत असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पुण्याच्या भाजपजनांना आनंद झालेला दिसत आहे. पिंपरीत महापौर बदलणार असेल तर पुण्यातही लवकरच बदलेल या आशेवर असणाऱ्यांना महापौरपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत.
देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर पहिल्यांदाच बहुमताने पुणे महापालिकेतही भाजपने झेंडा रोवला आहे. सुरुवातीलाच महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला गटात पडल्याने अनुभवी नगरसेविका मुक्ता टिळक यांच्या गळयात पदाची माळ पडली. अर्थात पूर्वीच्या पुणे पॅटर्ननुसार दार सव्वा वर्षांनी महापौर पदासह सर्व पदे बदलली जायची.त्यामुळे भाजपही हाच कित्ता गिरवणार का याकडेही सर्वांचे लक्ष होते. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामे दिले असल्याची चर्चा आहे.
आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर भावाभावासारखे असल्याने इथेही नेतृत्व बदल होईल अशी अनेकांना आशा आहे.इतकेच नव्हे तर बदल झाला तर कोण महापौर होईल याची चर्चाही रंगण्यास सुरुवात झाली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र यापूर्वीच असा कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितलेले आहे. दुसरीकडे विद्यमान पदाधिकारीही बदल होणार नसल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे. मात्र तरीही अनेकांनी दिवास्वप्न रंगवण्यात धन्यता मानली आहे.