"Why is the BJP so angry with its Mumbai police?" - Varun Sardesai | "भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?"

"भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का?"

ठळक मुद्देराम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. ही बाब समजताच शिवसेनेने राम कदम यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

मुंबई : पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विशेष म्हणजे, पोलिसांला मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी फोन केला होता. त्यामुळे राम कदम यांच्याविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. 

राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे. तर भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का आहे, असा सवाल युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विचारला आहे.

"मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजपा कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला ? भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये!", असे ट्विट वरुण सरदेसाई यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका जेष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला हे भाजपा कार्यकर्ते धडकले. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपाचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले आणि आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी व आयुष राजभर यांना ताब्यात घेऊन रिक्षाने नेते असताना नितीन खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी रिक्षातच मारहाण केली होती.

घटनेत पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही तासांच्या आत आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. ही बाब समजताच शिवसेनेने राम कदम यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

Web Title: "Why is the BJP so angry with its Mumbai police?" - Varun Sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.