नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये जर देशात आज निवडणुका घेतल्या गेल्या तर भाजपाच पुन्हा बहुमताने सत्तेत येईल असे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत, हे देखील समोर आले आहे. परंतू मोदींनंतर पंतप्रधान कोण? यावरही लोकांनी एका नावाला पसंती दिली आहे.
इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती. आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहायचे आहे. सध्यातरी लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झालेले पहायचे आहेत. परंतू दुसऱ्या क्रमांकावर किंवा मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान हवेत असे विचारल्यावर लोकांनी योगींच्या नावाला पसंती दिली आहे. योगी आदित्यनाथांना 10 टक्के लोक तर गृहमंत्री अमित शहांना 8 टक्के लोक पंतप्रधानपदी पाहू इच्छित आहेत. यावरून योगींची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले आहे.
सर्व्हेनुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 7 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. तर 5 टक्के लोकांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना 4 टक्के लोकांना पसंती दिली आहे. तर प्रियंका गांधी यांना 3 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. यानंतर मायावती, अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नितीशकुमार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 2-2 टक्के लोकांनीच पंतप्रधानपदी पसंती दिली आहे.
आजवरचे आवडते पंतप्रधान कोण?
सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली. ११ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं.
Web Title: Who is the next Prime Minister after Narendra Modi? Sharad Pawar? Revealed in the survey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.