"रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने जमीन दिली होती. परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?," असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला."मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. रामदेवबाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० हजार रोजगार निर्मिती होईल तसेच दररोज ५ हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायंस डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २००० तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल असा दावा करण्यात आला होता पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही," असं पटोले यावेळी म्हणाले. दरम्यान, यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर दिलं. "बाबा रामदेव, अनिल अंबानींसह ज्यांना ज्यांना उद्योग निर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करुन दिल्या पण त्या जागेवर उद्योग उभे राहिले नाहीत त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करु," असं नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
"बाबा रामदेव, अनिल अंबानींना मिहान प्रकल्पात दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 13:46 IST
Maharashtra Vidhan Sabha Session : शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत?, पटोलेंचा सवाल
बाबा रामदेव, अनिल अंबानींना मिहान प्रकल्पात दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार?
ठळक मुद्देमिहान प्रकल्पात बाबा रामदेव, अनिल अंबानी यांना उद्योगासाठी देण्यात आली होती जमिनउद्योग का सुरू झाले नाहीत, पटोलेंचा सवाल