'These dada will not kill me'; lively discussion on Ajit Pawar in the Assembly | 'हे दादा मला मारणार नाहीत'; अजित पवारांवरून विधानसभेत रंगली खुसखुशीत चर्चा

'हे दादा मला मारणार नाहीत'; अजित पवारांवरून विधानसभेत रंगली खुसखुशीत चर्चा

विधानसभेत एका भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धमाल उदाहरण दिले. सत्ताधारी बाकाकडे हात करत फडणवीस म्हणाले, समजा मला या दादांनी  मारले... (समोर अजितदादा बसले होते) तसे ते मला मारणार नाहीत.... पण समजा मारले तर.... फडणवीस यांचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत समोरून आवाज आला..., चंद्रकांतदादा मारतील...! त्यावर फडणवीस म्हणाले,  ते दादा तर  बिलकुलच मारणार नाहीत....  त्यावर अजितदादा गालातल्या गालात हसत होते.... तर अजितदादा यांच्याविषयीचा फडणवीस यांचा गाढा विश्वास नेमका काय सांगून गेला, याचीच चर्चा नंतर रंगली...

नारायण भंडारी 
की सरकार!

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक किस्सा सांगितला. शाळेमध्ये कोणाला मॉनिटर करायचे? यावर चर्चा सुरू असते. वर्गातले शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात, तुला काय वाटते सांग...  एक मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरून तंबाखू चुना घेऊन येईन, तुम्हाला देईन... दुसरा विद्यार्थी म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरून अफू गांजा घेऊन येईन, तुम्हाला देईन... तिसरा मुलगा म्हणतो, मी नारायण भंडारीच्या घरून दारूचा खंबा घेऊन येईन.... शेवटी गुरुजी एका कोपऱ्यात बसलेल्या मुलाला विचारतात, तू मॉनिटर झालास तर काय करशील.? तो मुलगा म्हणतो, मी सकाळी लवकर उठतो. आंघोळ करतो. देवाला नमस्कार करतो. वडीलधाऱ्यांना नमस्कार करतो. जेवण करतो. शाळेत येतो. अभ्यासात लक्ष देतो. घरी गेल्यानंतर पुन्हा हात पाय धुतो. देवाला नमस्कार करतो. जेवण करतो आणि अभ्यास करत झोपी जातो. गुरुजी एकदम खुश होतात. ते म्हणतात तुझं नाव काय बेटा...? मुलगा म्हणतो माझं नाव नारायण भंडारी...! हे उदाहरण फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारसाठी दिले. मात्र, सरकारमधला नारायण भंडारी कोण हे त्यांनी सांगितले नाही. त्यावर सत्ताधारी बाकावरून भाजपमधील नारायण भंडारी कोण, असे सवाल आले नसतील तर नवल...!

आमची आरटीपीसीआर तपासणी नको
अधिवेशनाला येणाऱ्या आमदार, अधिकारी आणि पत्रकार यांची येत्या शनिवारी - रविवारी पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्रासलेल्या आमदारांनी आमची अँटिजेन  चाचणी करा, पुन्हा आरटीपीसीआर करण्याची काय गरज, असे म्हणत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे दालन गाठले.  शनिवार - रविवार आम्ही मुंबईतच थांबणार आहोत. मतदारसंघात जाणार नाही. मग आमची तपासणी का करता? असा त्यांचा सवाल होता. लोकसभेत अधिवेशनाच्या वेळी अँटिजेन तपासणी करण्यात आली होती. मात्र, मुंबईत अधिवेशनाच्या वेळी आरटीपीसीआर तपासणीचा आग्रह धरला जात आहे. पुढच्या आठवड्याचे अधिवेशन फक्त तीन दिवसांचे आहे. त्यामुळे आमचीदेखील अँटिजेन चाचणी करा, असा आमदारांचा आग्रह आहे.  वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना   सभापतींनी आज बोलावून घेतले होते. यावर नेमका काय निर्णय होईल, हे लवकरच समोर येईल. पण, आरटीपीसीआर तपासणी करण्यास आमदार फारसे उत्सुक नाहीत, असे चित्र आहे.  

रात्री व पहाटेचा अभ्यास
वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीचा विषय विधानसभेत सध्या चर्चेत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी जलसंपदा विभागाच्या निधीचे वाटप कशा पद्धतीने केले जाणार आहे? याची माहिती मागितली. जर लवकर माहिती दिली तर आम्ही रात्री बसून अभ्यास करतो, असे ते म्हणाले. नेमका तोच धागा पकडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, भाजपच्या लोकांना हल्ली रात्री आणि पहाटेच अभ्यास कसा करावा वाटतो? दिवसा ते काय करतात? त्यावर सुधीर मुनगंटीवार काही बोलले नाहीत. मात्र, विधान भवन परिसरात पटोले म्हणाले, भाजपचा हल्ली रात्री किंवा पहाटे अभ्यास करण्यावर फारसा विश्वास राहिलेला नाही. कारण असा अभ्यास करून परीक्षा दिली की, पास होण्याची गॅरेंटी नाही. पटोले यांचा कल अर्थातच फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीशी होता!


विश्वासात न घेताच अमरावतीचे लॉकडाऊन
अमरावतीमध्ये विभागीय आयुक्तांनी २१ फेब्रुवारीला सायंकाळी पाच ते सकाळी आठ या वेळात संचारबंदीचा आदेश काढला. त्याचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तसाच आदेश काढला. मात्र, दुपारी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट लॉकडाऊन जाहीर केला. त्यावर अमरावती जिल्ह्यातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला विश्वासात न घेता अचानक  लॉकडाऊन जाहीर करण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. हा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवता आला असता, पण तसे न करता थेट लॉकडाऊन करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आ. सुलभा खोडके म्हणाल्या, मला तर त्या मीटिंगला बोलावलेदेखील नाही. ज्या 
भागात रुग्ण वाढत आहेत, त्या ठिकाणी व्यवहार बंद ठेवणे 
समजू शकतो. मात्र, पूर्ण शहर बंद ठेवणे किंवा जिल्हा बंद ठेवणे योग्य नाही. 

 

Web Title: 'These dada will not kill me'; lively discussion on Ajit Pawar in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.