'ठाकरे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर सुरू आहे', चंद्रकांत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:12 IST2021-08-27T17:12:01+5:302021-08-27T17:12:15+5:30
Chandrakant Patil on Maharashtra government: 'आम्ही सुद्धा संयमानं एक एक बॉम्ब टाकणार...'

'ठाकरे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर सुरू आहे', चंद्रकांत पाटलांची टीका
सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांना जामीन मंजुर झाला, पण या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजपा असं चित्र पाहायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला केलाय.
सांगलीत मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे महाविकास आघाडी सरकार फक्त गुंडांच्या जोरावर चाललंय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आता शेवटची तडफड सुरू आहे. आम्ही तुटू-फुटू असं त्यांना वाटतं असेल. पण आम्ही सुद्धा संयमानं एक एक बॉम्ब टाकणार, असा इशारा पाटलांनी यावेळी दिला.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय भाजप एकही निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. तसेच, नेहमी एकमेकांविरोधात भांडायचं आणि फुटायची वेळ आली की एकमेकांना घट्ट पकडून ठेवायचं. लोकांना उल्लू बनवण्याचं काम सुरू आहे, असंही पाटील म्हणाले.