"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 06:37 PM2020-09-27T18:37:39+5:302020-09-27T18:38:52+5:30

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

Take possession of Raigad fort from the center to the state; Chhagan Bhujbal demand to CM | "रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

"रायगड किल्ला केंद्राकडून ताब्यात घ्या"; छगन भुजबळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

Next

मुंबई -  जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसीडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तिर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची संकल्पना मांडली. तसेच नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस इथे रहावे यासाठी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. परिसरातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रुंगीगड आदी पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहे. आज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठी चालना मिळेल, असं त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी एरियल फोटोग्राफी करत असताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. राज्याचे सौंदर्य आणि वैभव डोळ्यात मावत नाही. हे वैभव जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यातील फक्त पर्यटनस्थळांचा विकास करुन चालणार नाही. तिथे जायचे कसे, रहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्यंभूत माहिती आणि सोयी-सुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने कामकाज सुरु केल्यानंतर लगेच रायगडच्या विकासासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी दिला. कोकणातील चिपी विमानतळही आता लवकरच सुरु होत आहे. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Take possession of Raigad fort from the center to the state; Chhagan Bhujbal demand to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.