मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

By प्रविण मरगळे | Published: September 26, 2020 01:30 PM2020-09-26T13:30:41+5:302020-09-26T13:33:43+5:30

इंदूरच्या विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी पोहचले होते.

Suspension of officer giving cold meal to CM Shivraj Chouhan; Action of Indore District Collector | मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २३ सप्टेंबर रोजी इंदूर येथे आले होते.बुरहानपूरचा दौऱ्यावरुन इंदूर येथे पोहचण्यास मुख्यमंत्र्यांना झाला २ तास उशीर जेवण पॅक करुन देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या सूचना

इंदूर - जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक मनीष स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या इंदूर दौर्‍यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली.

खरं तर मुख्यमंत्री दौर्‍यावर येतात तेव्हा त्यांच्या कर्मचार्‍यांसह बर्‍याच जणांच्या जेवणाची व्यवस्था प्रोटोकॉल अंतर्गत केली जाते. यात बुधवारी हलगर्जीपणा झाला. एकीकडे जेवण देण्यास विलंब झाला आणि जेव्हा ते आले तेव्हा त्याची गुणवत्ता खराब होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रोटोकॉल अंतर्गत मुख्यमंत्र्यांसाठी चांगल्या दर्जाचं जेवण असायला हवं होतं. अन्न पॅकींग करताना संपूर्ण प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २३ सप्टेंबर रोजी इंदूर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या जेवणाची गुणवत्ता चांगली नसल्यानं एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मनीष स्वामी यांना निलंबित करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलमध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी ही कारवाई केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई मागे घेत पुन्हा मनीष स्वामी यांच्याकडे कार्यभार सोपवला.

इंदूरच्या विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी पोहचले होते. त्याआधी ते बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर विधानसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर होते. यामुळे मुख्यमंत्र्यांना इंदूर येथे पोहचण्यास दोन तास उशीर झाला. ते संध्याकाळी ६.१५ वाजता पोहोचणार होते परंतु त्यांना येण्यास रात्रीचे ८.१५ वाजले. रात्र आणि खराब हवामानामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी गाडीने भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला. एकामागोमाग एक कार्यक्रम सुरु असल्याने मुख्यमंत्र्यांना जेवणही करण्यास वेळ मिळाला नाही. म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जेवण पॅक करुन ते गाडीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

याबाबत खुलासा देताना अन्न निरीक्षक मनीष स्वामी म्हणाले की, जिल्हाधिकारी मनीष सिंह यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार सायंकाळी ६ वाजता जेवण तयार करण्यात आले. परंतु मुख्यमंत्र्यांना दोन तास उशीर झाला आणि रात्री ९ वाजता ते इंदूरहून रवाना झाले. मी दुसऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पण ते  रस्त्याने भोपाळच्या मार्गे गेले. मी जेवण व्यवस्थित पॅक केले होते, फक्त भाकरी थंड होती, बाकीचे अन्न गरम होते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एसी सुरु होता. तसे रात्रीच्या वेळी वातावरण थंड असल्याने भाकरी थंड झाली. यानंतर, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. आणि २४ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅपवर निलंबनाचा आदेश आल्याचं त्यांनी सांगितले.

मात्र या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. माजी मंत्री जीतू पटवारी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची खिल्ली उडविली, ते म्हणाले की, तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवता, तुमच्या राजवटीत बरेच लोक उपाशी झोपतात. त्यात थंड जेवण दिलं म्हणून तुम्ही एका अधिकाऱ्याला निलंबित केले, तुमची लाज वाटतेय अशा शब्दात  त्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे.

Web Title: Suspension of officer giving cold meal to CM Shivraj Chouhan; Action of Indore District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.