विदर्भातील शिवसेनेचा वाघ जायबंदी; संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:59 AM2021-03-01T05:59:53+5:302021-03-01T06:11:14+5:30

Sanjay Rathode pooja chavan case : राठोड आधी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा मतदारसंघातून आणि मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे.

Shiv Sena's tiger injured in Vidarbha; sanjay rathode political carrier in trouble | विदर्भातील शिवसेनेचा वाघ जायबंदी; संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द धोक्यात

विदर्भातील शिवसेनेचा वाघ जायबंदी; संजय राठोड यांची राजकीय कारकिर्द धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वयाच्या केवळ ५० व्या वर्षी चौथ्यांदा आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील. संजय राठोड यांची अशी दमदार वाटचाल आता त्यांच्या राजीनाम्यामुळे रोखली गेली असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


राठोड आधी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा मतदारसंघातून आणि  मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे. आदिवासींसाठी हा मतदारसंघ राखीव असल्याने राठोड यांनी राजकीय कारकिर्द घडविण्यासाठी आधीच्या दारव्हा मतदारसंघात जम बसविला.  गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा दोन उमेदवारांचे आव्हान मोडत मोठा विजय संपादन केला होता. यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी या त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक. पक्षातील आणि बाहेरच्या विरोधाचा सामना करीत ते राजकीय वाटचाल करीत राहिले.


देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या विदर्भातील चार आमदारांपैकी राठोड यांना वनखात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. वनखात्यातील काही निर्णयांवरूनही त्यांच्यावर टीका होत आली आहे. मात्र राठोडांचे फासे उलटे पडले ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने. पूजाच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी पूजा अरुण राठोड या तरुणीचा यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. या दोन्ही पूजा एकच असल्याचे म्हटले गेले आणि संजय राठोड यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. राठोड हे यवतमाळचे पालकमंत्रीदेखील होते.


पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळीला राहणारी तरुणी होती. टिकटॉक स्टार म्हणून ती अतिशय लोकप्रिय होती आणि तिचे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. तिच्या आत्महत्येनंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर आलेच नाहीत. वनविभागाच्या एकाही बैठकीला तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही ते हजर नव्हते. एकाही आरोपाचा खुलासा त्यांनी केला नाही. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानमध्ये ते २३ फेब्रुवारीला दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.  त्यावेळी त्यांनी पूजा आत्महत्येप्रकरणी आरोप फेटाळले होते आणि विरोधक घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा परिवहन मंत्री अनिल परब, खा.अनिल देसाई त्यांच्यासोबत होते.

पोलीस चौकशीचा ससेमिरा कायम 
विदर्भातील शिवसेनेचा हा वाघ रविवारच्या राजीनाम्याने जायबंदी झाला आहे. राजीनाम्याने त्यांच्यामागचे शुक्लकाष्ट संपण्याची शक्यता नाही. कारण पोलीस चौकशीचा ससेमिरा कायम असेल. विदर्भातील शिवसेनेचा एका उमद्या नेत्याला मंत्रिपद गमवावे लागले आणि वनखाते सांभाळणारा हा नेता आता तूर्त आरोपांच्या पिंजऱ्यात पुरता अडकला आहे.

Web Title: Shiv Sena's tiger injured in Vidarbha; sanjay rathode political carrier in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.