...म्हणून शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय

By प्रविण मरगळे | Published: October 5, 2020 01:55 PM2020-10-05T13:55:38+5:302020-10-05T13:57:55+5:30

Bihar Assembly Election, Shiv Sena, JDU News: आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं शिवसेनेनं सांगितले.

Shiv Sena will not be able to contest Bihar elections 2020 on the ‘Dhanushya Ban’ symbol | ...म्हणून शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय

...म्हणून शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही; आयोगाचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देबिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवण्याची मागणीशिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना बिहारच्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ८८ जागा लढवल्या आणि २ लाख ११ हजार मते मिळविली

मुंबई – बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाचं चिन्ह ‘बाण’ आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे.

याबाबत जेडीयू पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. जेडीयूला होणारं मतदान नकळत शिवसेनेला जाऊ शकतं. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक आणि प्रसिद्ध पक्ष नाहीत. त्यामुळे शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देऊ नये अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. नितीशकुमार यांच्या आक्षेपानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य करत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही असं सूचित केले आहे.

या प्रकारावर शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई म्हणाले की, बिहारमध्ये शिवसेनेला होणाऱ्या मतदानामुळे जेडीयू आणि त्यांचा मित्रपक्ष घाबरला आहे. शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलं आहे. त्यामुळे आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल असं त्यांनी सांगितले.

२०१५ निवडणूक लढलेल्यांना मिळणार संधी

विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे शिवसेनेचे बिहार प्रदेशप्रमुख कौशलेंद्र शर्मा यांनी सांगितले. परंतु बिहारमधील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात पक्ष आपला उमेदवार उभा करणार आहे. बर्‍याच जागांवर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाईल.

शर्मा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत नाव खराब असलेल्या उमेदवाराला उभे न करण्याच्या सूचना पक्षाच्या नेतृत्वाने केल्या आहेत. महिलांना निवडणुकीत अधिक तिकिट देण्यास सांगण्यात आले आहे. मागील निवडणुकीत पक्षाने ३ ते ४ महिला उमेदवार रिंगणात उतरले होते, परंतु यावेळी पक्ष महिलांना आणखी जास्त जागा देईल.

उद्धव आणि आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक

शर्मा म्हणाले की आम्ही बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पाठवण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पाटण्यात पत्रकार परिषद घेतील. शर्मा यांनी ५० जागांसाठी उमेदवारांची यादी शिवसेनेचे खासदार राऊत यांना दिली आहे. यातून शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना बिहारच्या प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ८८ जागा लढवल्या आणि २ लाख ११ हजार मते मिळविली.मात्र अनेक ठिकाणी शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं.

शिवसेनेचा निवडणूक अजेंडा

बिहार सरकारच्या राजकीय षडयंत्राला निवडणुकीच्या मैदानातून उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शिवसेनेच्या धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, दुसरे चिन्ह घेऊन शिवसेना मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. बिहार सरकारने मूळ प्रश्ना बाजूला ठेऊन सुशांत प्रकरणावरुन कसे राजकारण केले, हाच शिवसेनेच्या प्रचाराचा अजेंडा असेल, अशीही माहिती आहे.

Web Title: Shiv Sena will not be able to contest Bihar elections 2020 on the ‘Dhanushya Ban’ symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.