Shiv Sena Sanjay Raut Target BJP Devendra Fadanvis over BMC Election & Electricity bill | ‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले

‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले

ठळक मुद्देकाँग्रेसच्या मांडी लावून बसणाऱ्यांनी भगव्याचा अपमान केलाय. कुठला भगवा राहिलाय? शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झालीयभगवा तुमचा अन् आमचा वेगळा नाही, छत्रपतींचा भगवा, मराठी अस्मितेचा भगवा आहे मग तुमचा भगवा कोणता? भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव महापालिकेवर फडकवावा

मुंबई – राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसलं, त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, यातच शिवसेनेचा वचपा काढण्यासाठी भाजपानं आगामी मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र ही सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे.

मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, तर तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी शिवसेनेचा भगवा उतरवणं सोडाच पण त्याला हातही लावता येणार नाही असा टोला संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला, त्यानंतर आता पुन्हा भगव्यावरुन शिवसेना-भाजपात यांच्यात खडाजंगी झाली आहे. याबाबत टीव्हीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबई महापालिकेवर फडकणारा भगवा मराठी अस्मितेचा आहे. हा भगवा राजकारणाचा नाही, छत्रपतींच्या तेजातून निर्माण झालेला भगवा आहे. भगवा तुमचा अन् आमचा वेगळा नाही, छत्रपतींचा भगवा, मराठी अस्मितेचा भगवा आहे मग तुमचा भगवा कोणता? तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव महापालिकेवर फडकवावा, काश्मीरवर फडकवावा, बलुचिस्तानवर फडकवावा राजकारणात टीका-टिप्पणी होत असतात, आमचं हिंदुत्व जनतेला माहिती आहे असं ते म्हणाले.

तर काँग्रेसच्या मांडी लावून बसणाऱ्यांनी भगव्याचा अपमान केलाय. कुठला भगवा राहिलाय? शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झालीय, चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये ३०७ कलम पुन्हा लागू करू, वीर सावरकरांचा घाणेरड्या शब्दात अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करतायेत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

वीजबिलावरून राऊतांचा भाजपा-मनसेवर निशाणा

ऊर्जा खात्यातील थकबाकीला मागील भाजपा सरकारच जबाबदार आहे, त्यामुळे कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपाचं आंदोलन होत आहे का? आम्ही केवळ आरोप करत नाही तर थकबाकी वसूल झाली तर जनतेला नक्कीच दिलासा देऊ असं सांगत शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपा-मनसेला चिमटा काढला आहे.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले, त्यांच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण गरजेचे

शिवसेनेच्या भगव्या झेंड्याच्या शुध्दीकरणाची वेळ आली आहे. त्यांनी हिंदुत्व सोडून दिलेले आहे. त्यांची मनोधारणाच गोऱ्या लोकांच्या कामासारखी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना यांनी तिलांजली दिली आहे अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

 

Web Title: Shiv Sena Sanjay Raut Target BJP Devendra Fadanvis over BMC Election & Electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.