shiv sena mp sanjay raut gives explanation about meeting with bjp leader devendra fadnavis | फडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का?; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले...

फडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का?; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले...

मुंबई: राज्यात मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती असल्याचं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल, यावर सगळ्यांचं, अगदी भाजपचंही एकमत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट मुलाखतीसाठी घेतली होती, याचा पुनरुच्चार करत आम्ही यापुढेही भेटणार आहोत. विरोधकांशी संवाद असायला हवा, असं राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांची भेट घेतल्यानं शिवसेनेतला एक गट नाराज असल्याची चर्चा आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य  केलं. 'आमच्या भेटीवर कोणी नाराज असेल असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी गेल्या वर्षी भेटत होतो. त्यामुळेही काही जण नाराज होते. मात्र त्यातूनच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं,' असं राऊत म्हणाले. विरोधी पक्षांमधील नेत्यांना भेटायचं नाही असा कायदा आहे का, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतच असते. दोन डॉक्टर भेटतात तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातल्या घडामोडींवर चर्चा होते. साहित्यिक भेटतात, तेव्हा साहित्यावर गप्पा होतात. शास्त्रज्ञ भेटले की संशोधनांबद्दल बातचीत होते. तसंच राजकीय नेत्यांचंही आहे, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीवर भाष्य केलं. राज्यातलं सरकार पाच वर्ष टिकणार आहे. त्यामुळे पुढील वर्षे विरोधकांना काही काम नाही, असा टोला त्यांनी लगावला.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे माजी डीआयजी गुप्तेशर पांडे यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. 'गुप्तेशर पांडे जेडीयूमध्ये गेले. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. कोणी कोणत्या पक्षात जावं, तो त्यांचा प्रश्न. त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. पण त्यांनी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची नाहक बदनामी केली, यावर मला आक्षेप आहे,' असं राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांचे दात लवकरच घशात जातील, अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही लक्ष्य केलं. आता आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहत आहोत. सीबीआयनं गेल्या महिन्याभरात काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: shiv sena mp sanjay raut gives explanation about meeting with bjp leader devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.