आम्ही राष्ट्रवादीला बुडवू; शिवसेना खासदाराच्या विधानानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 13:03 IST2021-08-09T13:00:47+5:302021-08-09T13:03:15+5:30

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार जाधव यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

shiv sena mp sanjay jadhav attacks ncp over collectors appointment | आम्ही राष्ट्रवादीला बुडवू; शिवसेना खासदाराच्या विधानानं एकच खळबळ

आम्ही राष्ट्रवादीला बुडवू; शिवसेना खासदाराच्या विधानानं एकच खळबळ

परभणी: जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद समोर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पेटला असून शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गरज पडल्यावर माकडीणही तिच्या पिल्लाला बुडवते. आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू, असं खळबळजनक विधान शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केलं आहे. आमचं तेवढं उघडं करतात. आता पाणी वर जाऊ लागले आहे, अशा शब्दांत जाधव यांनी संताप व्यक्त केला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना जाधव यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानाची जिल्ह्यात चर्चा आहे.

'खूप सहन केलं. पण आता सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. जिल्हाधिकारी बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण राष्ट्रवादीनं एवढं रानं केलं की, जसं काही मोठा अपराध केला होता. तुम्हाला सगळं जमलंय. आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था राष्ट्रवादीवाल्यांची झाली आहे, अशा शब्दांत जाधव यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. इतकं होऊनही मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्हाला मान्य आहे. जो काही आदेश आला तो स्वीकाराला आहे. पण प्रत्येक गोष्टीत खाजवाखाजवी चालू आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय, असं संजय जाधव म्हणाले.

राष्ट्रवादीवर शरसंधान साधताना जाधव यांनी माकडीण आणि तिच्या पिल्लाच्या गोष्टीचा संदर्भ दिला. 'शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचं. कुठपर्यंत सहन करायचं. माकडीणीचा जीव धोक्यात येतो, तेव्हा स्वत:ला वाचवण्यासाठी ती आपल्याच लेकराला पायाखाली घालते. तेव्हा राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू, हे लक्षात ठेवा, असं संजय जाधव यांनी म्हटलं.

Web Title: shiv sena mp sanjay jadhav attacks ncp over collectors appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.