Shiv sena criticise bjp on Azaan and Hindutva issue in saamna Editorial | "बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच!"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

"बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणं विनोदच!"; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई - राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन केल्यापासूनच शिवसेनेने हिंदूत्व सोडल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जात आहे. यातच दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती एका माध्यमाला दिली होती. यानंतर भाजपच्या टीकेची धार आणखीनच वाढली आहे. यावर बोलताना, ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा नाकारली आहे, असा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर, "आहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल, तर सांगून टाका, की आपली शिवसेना आता "सेक्युलर"आहे, असे  भाजपच्या एका नेत्याने म्हटले होते. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

...बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच -
शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे!, असा वार शिवसेनेने भाजपवर केला आहे.

भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला -
भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे कौतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या कोविडचा प्रकोप आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवात गर्दी करू नये हे राष्ट्राचे व राज्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा. शिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढ्यापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला. त्यांनी यावर असा अपप्रचार सुरू केला की, ‘पहा, काय सुरू आहे. शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’. ‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱ्यांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे. 

त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार! -
दिल्लीच्या सीमेवर जे शीख शेतकरी बांधव आंदोलनात जमले आहेत त्यातील बहुसंख्य हे पूर्वाश्रमीचे ‘जवान’ आहेत व देशासाठी त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवले आहे.  यापैकी अनेकांची मुले आजही सीमेवर पाकड्यांशी लढत आहेत व त्यातील चारजण गेल्या दोनेक दिवसांत शहीद झाल्याचे वृत्त आहे. अशा राष्ट्रभक्तांना जे ‘ट्रोलभैरव’ अतिरेकी किंवा पाकडे म्हणून हिणवतात त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार! 

या देशातील 22 कोटी मुसलमान हे देशाचे नागरिक -
बरं, शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुर्म्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गोयल यांचीही काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत; पण आम्हाला त्याबाबत बखेडा निर्माण करायचा नाही. कारण या देशातील 22 कोटी मुसलमान हे देशाचे नागरिक आहेत, असे ही शिवसेनेने म्हटले आहे.

मशिदीवरील भोंग्यामुळे इस्लाम मजबूत होत नाही -
बांगलादेशी घुसखोर, पाकडे, रोहिंगे मुसलमान यांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका कठोर आहे; पण आतापर्यंत मोदी सरकारने किती बांगलादेशींचे उत्खनन करून त्यांना बाहेर फेकले ते ‘ट्रोलभैरव भक्त मंडळी’ सांगू शकतील काय? मशिदीवरील भोंगा हा वादग्रस्त विषय आहे. मशिदीवरील भोंग्यामुळे इस्लाम मजबूत होत नाही व याबाबत केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून हा गोंधळ आणि ध्वनिप्रदूषण थांबवायला हवे. त्याचा हिंदुत्वाशी संबंध जोडला, तरी हा विषय ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाशीच निगडित आहे. आज सर्वाधिक भोंगे हे उत्तर प्रदेश, बिहारातील मशिदींवर आहेत. कश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटवले, तरी या भोंग्यांवरून लोकांना उकसविले जाते. तेसुद्धा रोखायला नको काय? असा सवालही सेनेने केला आहे.

तेव्हा तो म्हणे, राजशिष्टाचाराचा भाग होता -
आता एखाद्या अजान स्पर्धा प्रकरणावरून हिंदुत्वाच्या शुद्धतेचे मोजमाप करायचेच म्हटले तर लोकांच्या मनातील पुढील प्रश्नांची उत्तरेही मिळायला हवीत.
1) श्रीमान लालकृष्ण आडवाणी हे पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जीनांच्या कबरीवर फुले उधळून व जीना हे इतिहासपुरुष असल्याचे सांगून आलेच होते. पण तेव्हा तो म्हणे, राजशिष्टाचाराचा भाग होता.

2) स्वतः पंतप्रधान मोदी हेसुद्धा खास विमानाने पाकिस्तानात उतरून नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचाच केक कापून आले. त्या केकची शिते त्यावेळी अनेकांच्या दाढीत अडकलीच होती. तेव्हा मात्र भाजपचे हिंदुत्व पातळ झाले नाही, तर तो एक ‘मास्टर स्ट्रोक’ होता.

3) भाजपने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. त्यामुळे गोमांस खाणे आणि बाळगणे हा गुन्हा ठरला. त्यातून हिंदुत्व प्रखर झाल्याचा प्रचार झाला; पण आजही गोव्यापासून ईशान्येकडील भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री अधिकृतपणे सुरूच आहे. ही विक्री बंद केली तर त्या राज्यातील भाजपच्या मतांवर परिणाम होईल म्हणून सगळं ‘बिनबोभाट’ सुरू आहे. मग काय हो ‘ट्रोलधाड्यांनो, हे मतांसाठी लांगूलचालन की काय ते नाही काय?’ असा सवालही शिवसेनेने विरोधकांना केला आहे.

Web Title: Shiv sena criticise bjp on Azaan and Hindutva issue in saamna Editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.