शरद पवारांकडून भाजपा नेत्यांची खिल्ली; “शुद्र राजकारण करणं योग्य नसतं, पण...”
By प्रविण मरगळे | Updated: November 24, 2020 19:04 IST2020-11-24T19:02:15+5:302020-11-24T19:04:19+5:30
NCP Sharad Pawar, BJP Devendra Fadanvis, Chandrakant Patil, Raosaheb Danve News: अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल असा टोला पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

शरद पवारांकडून भाजपा नेत्यांची खिल्ली; “शुद्र राजकारण करणं योग्य नसतं, पण...”
मुंबई -मंदिर उघडा या विषयावर जे काही राजकारण केलं गेलं त्यावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण ठीक आहे निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे.
शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार सुरू आहे. त्यांना सर्वसामान्यांचा ज्यापध्दतीने पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा मिळाल्याच्यानंतर जे काही नैराश्य आले त्या नैराश्यातून हे सर्व होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत काम करत आहेत. पण ठीक आहे मला त्यांचा हा गुण माहित नव्हता. साधारणतः खेड्यापाड्यात शेतकर्यांमध्ये काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहात होतो. पण उद्याचं चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे तर तसं होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुडया ज्योतिषाचं काही चालत नाही असा चिमटा शरद पवार यांनी दानवेंना काढला.
त्याचसोबत सत्ता गेल्यानंतर त्रास होतो मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी अशाप्रकारचे शब्द जनरली न वापरणारेही वापरायला लागतात त्यामुळे ते गांभीर्याने घेऊ नये, त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठीक आहे त्यांच्याकडे बारकाईने लोक लक्ष देतात. अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल असा टोला पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
दरम्यान, सत्तेचा गैरवापर आपल्या विचारांशी जे लोक नाहीत त्यांच्याविरोधात वापरायची ही पध्दत याठिकाणी सुरू झालीय यापेक्षा काही वेगळं नाही अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर भाष्य केले आहे. तर जरा गंभीरपणाने महाराष्ट्र नोंद घेतो अशांचे प्रश्न विचारा काही काय विचारता! असं सांगत शरद पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर दिलं.