Sharad Pawar criticized PM Narendra Modi Statement in Samana Interview with Sanjay Raut | शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...

शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...

ठळक मुद्देकेंद्राकडे जागतिक बँका आणि एशियन बँकेकडून पैसे उभे करण्याची ताकद आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे ती सावरण्यासाठी आणखी एका डॉ. मनमोहन सिंग यांची गरजआपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीत शरद पवारांनीनरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी हे बारामतीत आले असताना शरद पवार हे माझे गुरु आहे असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन राजकारणात कोणी कोणाचाच गुरु नसतो, फक्त सोय पाहिली जाते असा टोला पवारांनी लगावला आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले की, मी नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) गुरु आहे असं सांगून त्यांना अडचणीत आणू नका आणि मलाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, आपल्याला सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. शिवाय अलीकडे त्यांची आणि माझी भेटही झालेली नाही असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच अर्थव्यवस्थेसंबंधीच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मध्यंतरी एक गृहस्थ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, दुर्दैवाने काय झालं मला माहिती नाही. ते सोडून गेले, आता जी माणसं आहेत ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे ती सावरण्यासाठी आणखी एका डॉ. मनमोहन सिंग (Dr.Manmohan Singh) यांची गरज आहे असं मत शरद पवारांनी व्यक्त केले.

कोरोनाचं संकट आणि अर्थव्यवस्थेची पडझड

शेतीच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला पाहिजे, खासकरुन शेती आणि त्यांचे उत्पादन, शेतीशी संबंधित बाकीचे व्यवहार चालू आहेत. चालू नाहीत असं नाही, पण त्याला मार्केट नाही. मार्केट नसल्यामुळे सुरुवाताचे काही दिवस शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचं पुढे जाऊन करायचं काय? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आला आहे. त्यानंतर मालाच्या किंमतीचे प्रश्न आले. त्यामुळे शेती, अर्थव्यवस्था(Economy) संकटात आली. दुधासारखे जे शेतीचे जोडधंदे आहेत. त्याचा सप्लाय बंद झाल्यासारखी स्थिती होती. साधने नव्हती. या सगळ्या गोष्टीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.  

केंद्र काय करु शकतं?

केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे, केंद्राकडे नोटा छापायचा अधिकार आहे. केंद्राकडे जागतिक बँका आणि एशियन बँकेकडून पैसे उभे करण्याची ताकद आहे. तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र बरेच काही करु शकतं जे राज्यांना शक्य नाही. राज्यांना उद्या कर्जरुपाने पैसा उभा करायचा असेल तर त्यांना स्वत:च्या निर्णयाने काही करता येत नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याने किती कर्ज काढायचं याची सीमा ठरवून दिलेली असते आणि त्यामुळे राज्यांना मर्यादा आहेत. या संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज काढून आपण राज्य स्थिरस्थावर केली तर आपण एक चौकट करु आणि घेतलेले कर्जही परत करु शकतो असा विश्वास शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत (Sharad Pawar Interview with Sanjay Raut) व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ

Web Title: Sharad Pawar criticized PM Narendra Modi Statement in Samana Interview with Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.