दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी देणारा निकाल; सतेज पाटलांनी शब्द खरा करून दाखविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 07:38 IST2020-12-05T02:09:19+5:302020-12-05T07:38:41+5:30
दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत.

दक्षिण महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी देणारा निकाल; सतेज पाटलांनी शब्द खरा करून दाखविला
विश्वास पाटील
कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पक्षनेतृत्वाला दिलेला शब्द खरा करून दाखविला. दिल टाकलेल्या पैलवानासारखी स्थिती झालेल्या काँग्रेसला त्यांनी लढायला आणि जिंकायलाही शिकविल्याचे प्रत्यंतर या निकालाने आले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे मिळालेले भक्कम पाठबळ हेदेखील या विजयाचे महत्त्वाचे कारण आहे.
दक्षिण महाराष्ट्रात विधानसभेच्या ५८ जागा येतात. त्यामध्ये काँग्रेसचे सध्या पुण्यात दोन, सोलापूर, साताऱ्यात प्रत्येकी एक आणि सांगलीत दोन आमदार आहेत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे चार व आता विधानपरिषदेचे दोन असे तब्बल सहा आमदार झाले आहेत.
या मतदारसंघातून एकूण सहाजण इच्छुक होते; परंतु आसगावकर यांच्या उमेदवारीवर मोहोर उठविल्यावर अन्य पाचजणांना एकत्र येऊन त्यांना विश्वास दिला व जिल्ह्यात त्यांच्यात मतैक्य घडविले. आसगावकर हे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले होते. त्यांचा चेहराही परिचित नव्हता; त्यामुळे त्यांच्या मागे जनमत उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. ‘तुम्हाला शिक्षक हवा की संस्थाचालक?’ असाही प्रचार झाला; परंतु तो मतपेटीपर्यंत जाणार नाही, याची दक्षता घेतली. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वत:ची सगळी यंत्रणा उभी केली. आसगावकर उमेदवार असले तरी आपण स्वत: उमेदवार असल्यासारखे ते या निवडणुकीत राबले. त्यांना पहिल्या पसंतीची मते कशी जास्त मिळतील असे प्रयत्न त्यांनी केले. एकदा डोक्यात निवडणूक भिनली की त्यात गुलाल लागेपर्यंत उसंत घ्यायची नाही असा त्यांचा स्वभावच बनला आहे. त्यामुळेच ते नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून विजय खेचून आणू शकले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी खूप मेहनत घेतली.