Really, this Chief Minister is very bad ...! 'Poem by Jitendra Awhad | खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ जितेंद्र आव्हाड यांची कविता

खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ जितेंद्र आव्हाड यांची कविता

मुंबई : गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ अशी कविता केली आहे. ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी या कवितेत अनेक मुद्दे मांडले आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काहीही उत्तर देत नसले, तरी महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिल्यामुळे राजकीय चर्चादेखील रंगली आहे.
या कवितेत मंत्री आव्हाड यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला मदत केली, इथपासून ते सध्याचा लॉकडाऊन लावताना सगळ्यांशी केलेल्या चर्चेपर्यंत, आव्हाड यांनी या कवितेतून विषय मांडले आहेत.

कधी थाळ्या वाजवायला 
लावल्या नाहीत...
ना कधी मेणबत्या आणि दिवे लावायला लावले...
निर्णय घेताना घेतले विश्वासात...
विरोधकांचे त्यामुळेच फावले...
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचं खरंच राइट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले...
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा- पुन्हा आले...
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला 
दोषी ठरवत आहेत...
विरोधकांचे खरंच राइट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या...
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या...
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असताना 
तो मात्र लढत आहे...
विरोधकांचं खरंच राइट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!
ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव...
आठ हजार कोटींचे
विमान नको...
ना कोणत्या प्रकरणात
घूमजाव...
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे...
विरोधकांचं खरंच राइट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!
व्यापाऱ्यांचं ऐकून घेतोय...
विद्यार्थ्यांचं ऐकून घेतोय...
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन 
मोफत देतोय...
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
यासाठी तो शांततेत लढतो आहे...
विरोधकांचं खरंच राईट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!!
ना क्लीन चिट देता आली...
ना खोटी आकडेवारी देता आली...
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा 
त्याला करता आली...
जे होण्यासारखे आहे, 
तेच तो करतोय...
विरोधकांचं खरंच राईट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!
महाराष्ट्राचं मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय...
ऊठसूठ, सकाळ- संध्याकाळ
ते टीका सरकारवर करताय...
तो मात्र टीकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे...
विरोधकांचं खरंच राइट आहे...
खरंच... हा मुख्यमंत्री 
खूप वाईट आहे!

Web Title: Really, this Chief Minister is very bad ...! 'Poem by Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.