रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 15:28 IST2024-09-03T15:26:34+5:302024-09-03T15:28:12+5:30
Ramdas Athawale Assembly election : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

रामदास आठवलेंनी वाढवली भाजपची चिंता! दोन राज्यात विधानसभेच्या किती जागा लढवणार?
Ramdas Athawale News : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये पक्ष काही जागांवर उमेदवार देणार असून, उर्वरित जागांवर भाजपला पाठिंबा देणार, अशी घोषणा रामदास आठवलेंनी जाहीर केली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही आठवले अशीच भूमिका घेण्याची शक्यता आता बळावली आहे. भाजपसाठी ही बाब चिंता वाढवणारी असल्याचे म्हटले जात आहे.
जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या दोन्ही राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा रामदास आठवले यांनी केल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. रिपाइं ज्या जागांवर उमेदवार उतरवणार नाही, तिथे भाजपला पाठिंबा देणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवलेंचा पक्ष किती जागा लढवणार?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, "जम्मू काश्मीरमध्ये आम्ही 16-17 जागांवर निवडणूक लढवणार आहोत.इतर जागांवर आम्ही भाजपला पाठिंबा देणार आहोत. हरियाणामध्ये 10-12 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार असून, उर्वरित जागांवर भाजपला समर्थन देऊ. दोन्ही राज्यांमध्ये एनडीएचे सरकार येईल", असा दावा आठवलेंनी केला.
#WATCH मुंबई: केंद्रीय मंत्री और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठावले) के प्रमुख रामदास अठावले ने कहा, "जम्मू-कश्मीर में हम 16-17 सीटों पर चुनाव लड़ेंगे और बाकी सीटों पर हम भाजपा का समर्थन करेंगे। हरियाणा में हम 10-12 सीटों पर चुनाव लड़ेंगे और बाकी सीटों पर हम भाजपा का समर्थन… pic.twitter.com/lrlviyFriF
— ANI_HindiNews (@AHindinews) September 3, 2024
महाराष्ट्रात निर्णयाची पुनरावृत्ती करणार?
रिपाइं (आठवले) पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक पक्ष आहे. पण, गेल्या काही निवडणुकांत एनडीएमध्ये रिपाइंला जागाच मिळाल्या नाही. त्यामुळे निवडणूक लढवता आली नाही. लोकसभा निवडणुकीवेळी रामदास आठवलेंनी शिर्डी आणि सोलापूर या मतदारसंघांची मागणी केली होती. पण, त्यांना ते मिळाले नाही.
रामदास आठवले राज्यसभेचे खासदार असून, गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात मंत्री आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रिपाइंला जागा मिळाव्या अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने करत आहेत. आठवलेंनी जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. महायुतीमध्ये जागा मिळाल्या नाही, तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही ते स्वतंत्र उमेदवार उतरवू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.