Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजप ११ पैकी १० जागा जिंकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:54 IST2020-10-14T00:18:51+5:302020-10-14T06:54:45+5:30
सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे.

Rajyasabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजप ११ पैकी १० जागा जिंकणार?
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) काही पक्ष बाहेर पडले असले तरी सत्ताधारी भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक होईल तेव्हा ९४ झालेली असेल. या ११ पैकी जवळपास दहा जागा जिंकण्याची तयारी भाजपने त्या त्या राज्यांच्या विधानसभांत असलेल्या आपल्या संख्येच्या बळावर केली
आहे.
सध्या राज्यसभेत भाजपचे ८६ खासदार असून काँग्रेसची संख्या घटून ३८ होणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप ९ तर उत्तराखंडमधील एकमेव जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजपचे तीन सदस्य नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी, सरचिटणीस अरूण सिंह आणि नीरज शेखर यांना पुन्हा संधी मिळू शकेल. परंतु, भाजप जास्तीच्या सहा जागा जिंकेल. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये फक्त एक जागा जिंकू शकेल. सपचे नेते मुलायम सिंह यादव यांचे बंधू राम गोपाल यादव यांना पुन्हा संधी मिळू शकते. सपची राज्यसभेतील सदस्य संख्या आठवरून पाच होणार आहे. राज्यसभेत बहुजन समाज पक्षाचे फक्त दोन सदस्य असतील. त्याच्याकडे १९ आमदार असल्यामुळे तो स्वत:चा कोणताही उमेदवार निवडून आणू शकत नाही.
९ नोव्हेंबरला निवडणूक
उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका राज्यसभा जागेसाठी निवडणूक कार्यक्रम आयोगाने मंगळवारी जाहीर केला. ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी २० आॅक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. २७ ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, तर २ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निवडणूक झाल्यावर दोन दिवसांनी निकाल जाहीर होईल.