Hathras Gangrape : "हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं"

By सायली शिर्के | Published: October 2, 2020 04:24 PM2020-10-02T16:24:44+5:302020-10-02T16:55:18+5:30

Hathras Gangrape : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी योगी सरकारने हाथरस बलात्कार प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे हाताळल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे.

Pratap Sarnaik request send mumbai police to up for investigation hathras case | Hathras Gangrape : "हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं"

Hathras Gangrape : "हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं"

googlenewsNext

मुंबई - हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करावेत, मुलीचे अंत्यदर्शन घेऊ द्यावे, तिचा मृतदेह घरी नेऊ द्यावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. मात्र आधीपासूनच आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी धुडकावून लावली आणि कडेकोट बंदोबस्तात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावरून अनेकांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी योगी सरकारने हाथरस बलात्कार प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे हाताळल्याचं दिसत असल्याचं म्हटलं आहे. तसेच हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी उत्तर प्रदेश येथे पाठवावं अशी मागणी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी (2 ऑक्टोबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

"देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे, अमानवी पद्धतीने हाताळल्याचे दिसतेय. मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावे अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो" असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून "उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित दलित महिलेच्या नातेवाईकांना भेटायला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जात असताना यूपी पोलिसांनी राहुलजींना धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले. एका राष्ट्रीय नेत्याशी असे वर्तन करणाऱ्या यूपी पोलिसांचा मी निषेध करतो. सदर घटनेची चौकशी व्हायलाच हवी" असं म्हटलं आहे. 

Video - "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार", संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. यावरून विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे? हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे" अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Web Title: Pratap Sarnaik request send mumbai police to up for investigation hathras case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.