काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल; प्रभारी आज मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:31 IST2021-01-06T01:50:17+5:302021-01-06T07:31:12+5:30
Balasaheb Thorat: सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष देण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या मुंबई भेटीला महत्त्व आले आहे. दिल्लीला गेलेले थोरात मुंबईत परतले असून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल; प्रभारी आज मुंबईत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील हे मंगळवारी रात्री मुंबईत पोहोचले असून पुढील दोन दिवस ते काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मंत्री, आमदारांशी पक्षसंघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असावा, या संदर्भात काही निवडक नेत्यांची मतेही ते जाणून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष देण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या मुंबई भेटीला महत्त्व आले आहे. दिल्लीला गेलेले थोरात मुंबईत परतले असून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले, ही बातमी आली कुठून? माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. तशी कुठलीही चर्चा नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तर पद सोडण्याची आपली तयारी आहे. तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी पत्रकारांना सांगितले की आगामी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील पूर्वतयारी, रणनीती निश्चित करण्यासाठीच्या बैठकांसाठी पाटील यांचा हा दौरा आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा विषय त्यात नसेल.
कोणाची वर्णी लागणार?
थोरात यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून खा. राजीव सातव, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोेले, मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार आदी नावे चर्चेत आहेत. महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अशी तीन पदे थोरात यांच्याकडे आहेत.