खळबळजक Video! नितिशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदाफेक
By हेमंत बावकर | Updated: November 3, 2020 16:39 IST2020-11-03T16:37:11+5:302020-11-03T16:39:21+5:30
Bihar Election: याआधी मुजफ्फरपुर सकरामध्ये नितिशकुमारांच्या हेलिकॉप्टरकडे कोणीतरी चप्पल फेकली होती. ही चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नाही.

खळबळजक Video! नितिशकुमार नोकऱ्यांवर बोलताच गर्दीतून कांदाफेक
बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे. याचवेळी तिसऱ्य़ा टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर भाषणाला उभे राहताच कांदा फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला त्यांच्यावर दगडफेकल्याचे वृत्त आले होते.
मधुबनीच्या हरखालीमध्ये नितिशकुमार सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच समोरील गर्दीतून कोणीतरी त्यांच्यावर कांदा फेकला. यावर नितिशकुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत रहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे बोलायला लागले. यानंतर नितिशकुमारांना सुरक्षा रक्षकांनी घेरत सुरक्षा पुरविली आणि नितिशकुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.
सुरक्षारक्षकांनी जेव्हा कंदा फेकणाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितिशकुमारांनीच त्यांना नको म्हणून सांगितले. त्याला सोडून द्या, काही दिवसांनी स्वत:च त्यांना समजेल, असे ते म्हणाले.
Video: हे, घ्या २ हजार...१ नंबरच बटण, कमळ चिन्हावर मतदान करा; भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणावर बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधकांना जबाबदार धरले आहे. विरोधकांना पटले आहे की, ते मतदानातून आम्हाला हरवू शकत नाहीत, यामुळे ते अशाप्रकारच्या घटना घडवत आहेत. विरोधक पुन्हा तोच काळ परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हा हल्ला नितिशकुमारांवर झालेला जिवघेणा हल्ला आहे. ते तुम्हाला आवडो वा न आवडो मतांद्वारे सिद्ध होणार आहे. मात्र, हल्ला करून काय सांगू इच्छित आहात, हे बिहारची जनता पाहत आहे.
#WATCH: Stones pelted during Chief Minister Nitish Kumar's election rally in Madhubani's Harlakhi.#BiharPollspic.twitter.com/9gDoGEAEuJ
— ANI (@ANI) November 3, 2020
याआधी मुजफ्फरपुर सकरामध्ये नितिशकुमारांच्या हेलिकॉप्टरकडे कोणीतरी चप्पल फेकली होती. ही चप्पल हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचली नाही. तेव्हा मुख्यमंत्री नितिशकुमार मंचावर होते. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. चप्पल फेकताना काही लोक घोषणाबाजी करत होते. या व्यतिरिक्त नितिशकुमारांच्या रॅलीमध्ये मुर्दाबादची घोषणाबाजीही झालेली आहे.
एलजेपी प्रमुख चिराग पासवान यांच्या दाव्यानुसार नितिशकुमार यांच्याविरोधात लोकांमध्ये राग आहे. भाजपाचे नेते दबक्या आवाजात हे कबूलही करत आहेत.
भाजपकडून पैसेवाटप
गुजरातमध्ये विरोधी पक्ष कॉंग्रेसने मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. व्हिडिओमध्ये एक भाजपा कार्यकर्ता मतदान करण्यासाठी निघालेल्या लोकांना पैसे देताना दिसत आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनंतर सीईओ डॉ. मुरलीकृष्ण यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. कॉंग्रेसचे प्रवक्ते जयराजसिंह परमार यांनी फिर्याद दिली आहे. व्हिडीओमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मत देण्यासाठी चाललेल्या मतदारांना पैसे देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ कर्जन मतदारसंघातील मतदान केंद्रावरचा आहे.