एकतर्फी न राहिलेली निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:51 AM2019-04-30T03:51:54+5:302019-04-30T03:52:36+5:30

सतरावी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीने तीन-चार वळणे घेतली. विशेषत: महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात वेगळी निवडणूक झाली तर शहरी भागात निवडणूक स्पर्धेचे स्वरूप वेगळे दिसू लागले.

One-sided election | एकतर्फी न राहिलेली निवडणूक

एकतर्फी न राहिलेली निवडणूक

Next

प्रकाश पवार

सतरावी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीने तीन-चार वळणे घेतली. विशेषत: महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात वेगळी निवडणूक झाली तर शहरी भागात निवडणूक स्पर्धेचे स्वरूप वेगळे दिसू लागले. भाजपने ग्रामीण भागात मराठ्यांच्या राजकारणाची कोंडी केली. मराठ्यांना कोंडीत पकडले, परंतु शहरी भागात शहरी गरीब आणि राज ठाकरे यांना कोंडीत पकडता आले नाही. शिवाय सत्ताधारी विरोधी मतांचे एकत्रीकरण होत चालले आहे. उद्योगपती, चित्रपट उद्योग यांचा एक गट दोन्ही काँग्रेसला भाजपविरोध म्हणून पाठिंंबा देतो.

यातून शहरी भागात व्यक्तिगत किंवा गटांची स्पर्धा कमी झाली. गटांच्या ऐवजी भाजपविरोध, अमराठी विरोध (मोदी-शहा विरोध) या मुद्द्यांना प्रचारात धार आली. या गोष्टीची दुसरी बाजू म्हणजे तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ, घराणेशाही अशा मुद्द्यांची चर्चा जवळपास पडद्याआड गेली. मतदारांचे लक्ष राष्ट्रीय नेतृत्वाच्या विरोधावर केंद्रित झाले. यामुळे शहरी भागात जवळपास समसमान स्पर्धा दिसू लागली.

महाराष्ट्राचे राजकारण शहरी-ग्रामीण अशा दोन भागांमध्ये वेगवेगळे झाले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळपास झाले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शहरांत घडत आहे. शहरी मतदारांच्या राजकीय वर्तनाचा नमुना ग्रामीणपेक्षा वेगळा आहे. शहरी मतदारांवर भाजप-शिवसेनेचे नियंत्रण आहे. यांची तीन सकारात्मक, नकारात्मक व डावपेचात्मक कारणे आहेत. सकारात्मक कारणे तीन आहेत. एक, हे दोन्ही पक्ष शहरी आहेत. त्यामुळे त्यांनी घडवलेल्या राजकीय आखाड्यात ही स्पर्धा आहे. दोन, शहरी जीवनाशी संबंधित खाती भाजपकडे आहेत. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर भाजपचे नियंत्रण आहे. तीन, विशेष म्हणजे नरेंद्र मोदींच्या राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव शहरात दिसतो. या तीन सकारात्मक गोष्टींमुळे भाजप-शिवसेना शहरी भागात वरचढ आहे.

एक नकारात्मक कारण म्हणजे गेल्या पाच वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शहरी भागात विरोधी पक्ष म्हणून निटनेटके काम केले नाही. ही एक विरोधी पक्षाची पोकळी राहिली आहे. त्या पोकळीचा थेट फायदा भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांना मिळतोय. सकारात्मक, नकारात्मक कारणाशिवाय एक कारण डावपेचात्मक दिसते. ते म्हणजे बहुजन वंचित या स्वरूपाची शहरी गरिबांची मते दोन्ही काँग्रेसकडे जाण्यास अडथळा निर्माण केला गेला. थोडक्यात, बहुजन वंचित ही शहरी गरिबांची मते भाजप-शिवसेना विरोधी होती. त्यांचे विभाजन दोन्ही काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी असे घडते. त्यामुळे एकूण भाजप-शिवसेना विरोध दोन गटांमध्ये विभागला जात आहे.

मुंबई, ठाणे, कोकण, पुणे आणि नाशिक या भागातील लोकसभा मतदारसंघांवर शहरी राजकारणाचा प्रभाव आहे. येथे शिवसेना-भाजपच्या वरचढपणाला निवडणूक प्रक्रियेतून चार महत्त्वाच्या मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांचे उमेदवार स्पर्धेत आले. एक, काँग्रेसने न्याय ही योजना घोषणापत्रात आणली. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक-दीड लाख शहरी गरीब काँग्रेसबद्दल विचार करू लागला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने न्याय या इश्यूचा प्रचार केला (शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे). दोन, विरोधी पक्षाची पोकळी राज ठाकरे यांनी भरून काढली. त्यांनी मोदी-शहा विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे भाजपकडे वळलेला मराठी मतदार भाजपपासून दूर होण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा मराठी मतदार शिवसेनेच्या विरोधी गेला नाही तरी भाजपला त्यांचा फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. या प्रकारचा मतदार जवळपास पन्नास हजार-एक लाख प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आहे.

शिवाय यामुळे सत्ताधारी विरोधी मतांचे विभाजन कमी होईल. यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांची ताकद वाढली. तीन, महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात धर्मांशी संबंधित मते दोन-अडीच लाख आहेत. त्यांचा कल भाजप-शिवसेनेकडे आहे. यामध्ये फार फरक पडणार नव्हता. परंतु हेमंत करकरे यांची चर्चा नव्याने सुरू केली गेली. त्यांची प्रतिमा हिंंदूविरोधी, हिंंदू राष्ट्रवाद विरोधी अशी कधी स्पष्ट तर कधी घसरड्या पद्धतीने भाजपने घडवली. त्यास प्रतिक्रिया जोरदार आली. विशेष पोलीस, वेगवेगळ्या चळवळीमधील बुद्धिजीवी वर्ग आणि शहरी भागातील नागरिक यांचे एकत्रीकरण यामुळे झाले. यातून जवळपास पन्नास हजार-एक लाख मते दोन्ही काँग्रेसकडे वळण्याच्या शक्यता दिसू लागल्या.

चार, ग्रामीण भागात दोन्ही काँग्रेसमध्ये तीव्र गटबाजी होती. तसेच गटांकडे मते होती. त्यामुळे पक्षांतराचा फटका दोन्ही काँग्रेसला बसत होता. शहरी भागात मुळात दोन्ही काँग्रेसच्या अंतर्गत गट असले तरी मते नव्हती. त्यामुळे शहरी भागात काँग्रेसचे नुकसान होत नाही. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार स्पर्धेत आले. यामुळे शहरी भागात लोकसभेसाठी चुरस शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये दिसू लागली. यातून चुरशीचे वातावरण निर्माण झाले. चुरस निर्माण झाल्यामुळे काठावरील मते दोन्ही काँग्रेसविरोधी जाण्याच्या शक्यतांना आळा बसला. थोडक्यात, अत्यंत नाट्यमय पद्धतीने शहरी भागातील निवडणुकीची स्पर्धा उजवीकडून मध्यभागाकडे वळलेली दिसते. थोडक्यात, निवडणुकीची स्पर्धा एकतर्फी राहिली नाही.

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)

Web Title: One-sided election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.