OBC leader Prakash Shendge Criticize BJP | ’तेव्हा मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने मला पक्ष सोडायला भाग पाडले, आता खडसेंच्या बाबतीत तेच घडले’’

’तेव्हा मुंडेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने मला पक्ष सोडायला भाग पाडले, आता खडसेंच्या बाबतीत तेच घडले’’

मुंबई - एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णयनंतर राज्याच्या राजकारणात अनेक गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर आता माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केल्याने मला पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले होते. मला तिकिटही नाकारण्यात आले होते. आता खडसेंच्या बाबतीतही तेच घडलेय, असा आरोप शेंडगे यांनी केला आहे.

खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, मी दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत राजकीय जीवनात काम केले होते. त्यांच्यासोबत ओबीसी समाजातील अनेक नेते होते. एकनाथ खडसे हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. २०१४ मध्ये ज्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर मी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र त्या मागणीमुळे मला पक्ष सोडावा लागला होता. निवडणुकीत माझं तिकीटही कापण्यात आलं होतं, असा दावा शेंडगे यांनी केला.

गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.

मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: OBC leader Prakash Shendge Criticize BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.