nusrat jahan lashes out on jai shree ram salogan in cm mamta banerjee event tweet goes viral | "रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या 

"रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या 

नवी दिल्ली - कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यावरून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

नुसरत जहाँ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते" असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील घोषणा ऐकल्यानंतर कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली

"ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं"

भाजपाचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. "ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं" असं विज यांनी म्हटलं आहे. अनिल विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तर दुसरीकडे 'मला वाटते की, सरकारच्या कार्यक्रमात काही मोठेपण असले पाहिजे. हा राजकीय कार्यक्रम नाही. एखाद्याला आमंत्रण केल्यानंतर अपमान करणे आपल्याला शोभा देत नाही,' असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

"भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक; निवडणुकीआधी खोटी आश्वासनं देतील अन् संपली की पळून जातील" 

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आगामी निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. मात्र, आता त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. याच दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आता ममतांनी खडेबोल सुनावले आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे. "भाजपा नक्षलवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सापासोबत भाजपाची तुलना केला आहे. ज्यांची भाजपात जाण्याची इच्छा आहे ते जाऊ शकतात असं म्हमत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्यांना सुनावलं आहे. मंगळवारी पुरुलिया येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी ठणकावलं आहे. तसेच विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा वापर करत असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: nusrat jahan lashes out on jai shree ram salogan in cm mamta banerjee event tweet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.