माढ्याचा तिढा सुटणार? राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 12:09 IST2019-03-22T12:03:08+5:302019-03-22T12:09:57+5:30

आज संध्याकाळी शरद पवारांकडून शिंदेंचं नाव जाहीर होण्याची शक्यता

ncp likely to field sanjay shinde in madha constituency for lok sabha election | माढ्याचा तिढा सुटणार? राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

माढ्याचा तिढा सुटणार? राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

सोलापूर: रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश, शरद पवारांनी घेतलेली माघार यामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी मोठा तिढा निर्माण झाला होता. मात्र हा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. माढ्यातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाच्या मदतीनं सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले शिंदे आज राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. 

सुरुवातीला माढ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव चर्चेत होतं. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढवायची असल्यानं शरद पवार यांनी माघार घेतली. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी नको, असं म्हणत पवारांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. सध्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेत माढ्याचं प्रतिनिधीत्व करतात. विजयसिंह यांचे पुत्र राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र उमेदवारी मिळण्याची फारशी शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.



रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये गेल्यानं राष्ट्रवादी माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार, याची चर्चा होती. मात्र आज हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार आज संध्याकाळी बारामतीमधल्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत. यामध्ये संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. संजय शिंदे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचे लहान भाऊ आहेत. संजय शिंदे मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांना थोड्या फरकानं पराभव पत्करावा लागला. 

Web Title: ncp likely to field sanjay shinde in madha constituency for lok sabha election