एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा; “माझा छळ करणं तुम्हाला महागात पडेल, जेवढं छळाल तेवढं...”
By प्रविण मरगळे | Updated: February 13, 2021 08:14 IST2021-02-13T08:12:50+5:302021-02-13T08:14:15+5:30
Eknath Khadse Criticized BJP: ४० वर्षापासून नाथाभाऊ असाच आहे, काहीच उद्योग केले नाहीत, म्हणून भारतीय जनता पार्टीला नाथाभाऊंबद्दल शोधून शोधून काहीच सापडत नाही.

एकनाथ खडसेंचा भाजपाला इशारा; “माझा छळ करणं तुम्हाला महागात पडेल, जेवढं छळाल तेवढं...”
जळगाव – राष्ट्रवादी परिवार संवादच्या निमित्ताने जामनेर येथे एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. भाजपानं माझा जेवढा छळ केला आहे ते त्यांना महागात पडणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी दिला आहे, भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात पक्ष सोडताना असुरक्षितता आहे असंही खडसेंनी यावेळी सांगितले. (NCP Leader Eknath Khadse Warns BJP)
यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, आज कार्यकर्ते भाजपा सोडतायेत, त्यांच्या मनात असुरक्षितता आहे, इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्यामागे ईडी लावली जातेय, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जातं आहे, पण मी कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधीही २ नंबरच्या धंद्यात पडलो नाही, अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतलेत, कामासाठी पैसे घेतलेत, एकाने उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलतायेत असं आव्हान त्यांनी दिले.
त्याचसोबत ४० वर्षापासून नाथाभाऊ असाच आहे, काहीच उद्योग केले नाहीत, म्हणून भारतीय जनता पार्टीला नाथाभाऊंबद्दल शोधून शोधून काहीच सापडत नाही. बायकोने जमिनीचा व्यवहार केला पावणे चार कोटीचा, त्यात अर्धाव्याज आहे पावने दोन कोटीचा, त्यात नाथाभाऊ खात्यावरून दिले २५ लाख रुपये, माझ्याकडे शेती आहे, मी जमीनदाराचा पोरगा आहे, तरीही त्याचसाठी नाथाभाऊंचा छळ सुरू आहे आणि छळणं महागात पडेल, पण भाजपाला मी सांगू इच्छितो जेवढं तुम्ही नाथाभाऊंचा छळ कराल तेवढचं तुमच्यापासून पदाधिकारी आणि माणसं दूर जातील ते NCP कडे वळतील. आजही अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत येतायेत असा इशारा एकनाथ खडसेंनी भाजपाला दिला आहे.
...आता मी सीडी लावण्याचं काम करणार
मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटलांसह अनेकांनी मला सांगितलं तुमच्या मागे ईडी लागू शकते, त्यावर मी प्रवेश मेळाव्यात म्हटलं होतं, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. परंतु आता माझ्यामागे प्रत्यक्षात ईडीची चौकशी लावली आहे, त्यामुळे मी सीडी लावण्याचं काम करणार आहे असं म्हणत खडसेंनी भाजपाला गंभीर इशारा दिला.
माझा गुन्हा काय आहे?
"मी विधानसभेच्या सभागृहात वारंवार विचारत आलो, माझा गुन्हा काय आहे? पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. संघर्ष हा माझा स्थायी स्वभाव आहे. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही असं सांगताना एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) टीका केली.
जे बापाचे झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार?
भाजपामध्ये जाणीवपूर्वक बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं जातं. ज्यांनी पक्षाला मोठं केलं, त्यांच्यावरच बेछूट आरोप केले. जे बापाचे होत नाहीत, ते जनतेचे काय होणार?", असा घणाघाती आरोपही एकनाथ खडसेंनी केला आहे.