Nashik Oxygen Leak: दुर्घटनेचे राजकारण! नाशिक महापालिकेत सत्ता भाजपची, निशाणा राज्य सरकारवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 05:49 AM2021-04-22T05:49:50+5:302021-04-22T05:50:22+5:30

महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र, भाजप नेते महापालिकेऐवजी सरकारवरच तुटून पडल्याचे चित्र बघावयास मिळाले.

Nashik Oxygen Leak: BJP in power in Nashik Municipal Corporation, targeting state government! | Nashik Oxygen Leak: दुर्घटनेचे राजकारण! नाशिक महापालिकेत सत्ता भाजपची, निशाणा राज्य सरकारवर !

Nashik Oxygen Leak: दुर्घटनेचे राजकारण! नाशिक महापालिकेत सत्ता भाजपची, निशाणा राज्य सरकारवर !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेतही विरोधकांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे महापालिकेचे असून, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र, भाजप नेते महापालिकेऐवजी सरकारवरच तुटून पडल्याचे चित्र बघावयास मिळाले.


महापालिकेने जुन्या नाशकातील कथडा भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत ठेवले आहे. १५० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात बुधवारी सकाळी क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे १५७ रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी १३१ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. एकूण रुग्णांपैकी ६३ रुग्ण हे अतिगंभीर होते. दुपारच्या सुमारास येथील ऑक्सिजन टाकीला गळती लागली आणि एकच धांदल उडाली. त्याची तांत्रिक दुरुस्ती होईपर्यंत ऑक्सिजनवर असलेल्या २२ जणांना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


सदर रुग्णालयात महापालिकेने १५ ते २० दिवसांपूर्वीच ऑक्सिजनची टाकी बसवली होती. ठेकेदारामार्फत या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. या रुग्णालयाचे सारे संचालन महापालिकेमार्फत चालते, असे असताना या दुर्घटनेनंतर भाजप नेते राज्य सरकारवर तुटून पडले. 
रुग्णांच्या कुटुंबीयांचा आक्रोश !

नाशिक : कुणाची आई, कुणाचे दाजी, कुणाची बहीण, कुणाची आजी, कुणाचे वडील तर कुणी सख्खा भाऊ गमावल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. कुणी डॉक्टरांना, कुणी प्रशासनाला, कुणी शासनाला दोष देत होते. तर कुणी फोनवर कुटुंबीयांशी बोलत त्यांची हतबलता व्यक्त करीत होते. रुग्णालयाबाहेर येणारा प्रत्येक नातेवाईक ह्रदय पिळवटून टाकणारा टाहो फोडत होता. कुणी तळतळाट व्यक्त करीत होते, तर कुणी आपलीच छाती बडवून घेत होते. अशा शोकसंतप्त नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना.
दहा दिवसांपासून माझे दाजी ॲडमिट होते. मी दहा दिवसांपासून घरी न जाता इथेच रुग्णालयाबाहेर थांबून होतो. आता दोन-तीन दिवसांत त्यांना घरी नेणार होतो. आता बहिणीला काय सांगू, तेच कळत नाही. 
- अविनाश बिऱ्हाडे 
(मृत सुनील झाल्टे यांचा मेव्हणा)
आमचे व्याही हे मागील आठवड्यापासून उपचार घेत होते. इथे ऑक्सिजनची दुर्घटना घडल्याचे समजल्याने  तत्काळ आलाे. मात्र, ते वाचू शकले नाहीत. 
- शांताराम पाटील 
(मृत श्रावण पाटील यांचे व्याही) 

ऊठसूट ठाकरे सरकारवर बरसणाऱ्या भाजप नेत्यांना महापालिकेत त्यांचीच सत्ता असल्याचा विसर पडल्याचे दिसते. महापालिकेत ठेकेदार व भाजप या एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत. ठेकेदार पाहून काम दिले जाते. ही दुर्घटना म्हणजे पालिकेतील व्यवस्थेचे बळी आहेत. 
- अजय बोरस्ते, 
विरोधी पक्षनेते, नाशिक मनपा

Web Title: Nashik Oxygen Leak: BJP in power in Nashik Municipal Corporation, targeting state government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.