Narayan Rane vs Shivsena: युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावं; वरुण सरदेसाईंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 12:56 IST2021-08-24T12:53:19+5:302021-08-24T12:56:50+5:30
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे

Narayan Rane vs Shivsena: युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचे निलंबन करावं; वरुण सरदेसाईंची मागणी
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत आले आहेत. नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणे यांच्या बंगल्याबाहेर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावेळी राणे समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना भिडले. पोलिसांना याठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
यावेळी वरुण सरदेसाई म्हणाले की, आव्हान देण्याची भाषा राणेंकडून करण्यात आली होती. आपण त्यांच्या बंगल्याबाहेर जमलो, मात्र उंदिर आधीच पळून गेले होते. नारायण राणेंना अटक व्हायलाच हवी. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी कुठलाही कायदा-सुव्यवस्था हातात घ्यायचं नाही. ज्यांनी आव्हान दिलं ते आम्ही स्वीकारलं. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नारायण राणे यांना अटक करायची ही मागणी करायची आहे. तसेच ज्या पोलिसांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मारलं त्यांनाही निलंबित करण्याची मागणी सरदेसाईंनी केली आहे.
राज्यभरात राणेविरुद्ध शिवसैनिक संघर्ष पेटला, नितेश राणेंना पोलिसांनी अडवलं
युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जुहू येथील बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न
आमदार नितेश राणे यांनी सकाळी ट्विट करून काही युवासेनेचे कार्यकर्ते बंगल्याबाहेर जमणार असल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना अडवावं त्यानंतर जे काही होईल त्यासाठी आम्ही जबाबदार नाही असं सांगत सिंहाच्या हद्दीत येऊ नका असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी केली. त्याठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात मोठी घोषणाबाजी केली. नितेश राणे यांनी जे आव्हान दिले त्याला उत्तर म्हणून आम्ही इथं आलो. तुमच्यात हिंमत असेल तर बाहेर पडा. पोलिसांच्या आड त्यांचे कार्यकर्ते लपले होते. आमची दोन हात करण्याची तयारी आहे. उंदिर बिळात लपलेत असा टोला युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नारायण राणेंना लगावला.
केंद्रात आमचीच सत्ता, बघूया शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा सूचक विधान राणेंनी केलं.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी ऐकिव माहितीच्या आधारे बोलणार नाही. मी काय सामान्य वाटलो का? मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे, असं म्हणत नारायण राणेंनी संताप व्यक्त केला. माझ्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली, त्याचं नाव घेऊन बोला, असं राणेंनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी राणेंना सांगितलं. त्यावर कोण बडगुजर? मी त्याला ओळखत नाही, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं.
राणेंच्या बंगल्याबाहेर शिवसैनिक-भाजपा समर्थक भिडले; दगडफेक अन् लाठीचार्ज
पुण्यात राणेंच्या मॉलवरही दगडफेक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आज गुडलक चौकात कोंबड्यांसह आंदोलन केले असून डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्याचा राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.