Mumbai Dabbewala raised problem to Raj Thackeray & CM Uddhav Thackeray allowed to travel in local | राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला

राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’वर समस्या मांडली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ निर्णय घेतला

ठळक मुद्देराज्यात अनलॉक ५ मध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीडबेवाल्यांची लाइफलाइन लोकल आहे. या लोकलने आता प्रवास करण्याची मुभा दिली त्याबद्दल सरकारचे आभारमुंबई डबेवाले असोसिएशनने मानले ठाकरे सरकारचे आभार

मुंबई – गुरुवारपासून राज्यात अनलॉक ५ सुरु होणार आहे. याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली, यात येत्या ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचसोबतच लोकलच्या संख्या वाढवत मुंबईच्या डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. याबाबत मुंबई डबेवाले असोसिएशनने ठाकरे सरकारचे आभार मानलेत.

याबाबत मुंबईचे डबेवाले म्हणाले की, गेले ७ महिने मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय ठप्प होता, मुंबईची लाइफलाइन लोकल आहे तसे डबेवाल्यांची लाइफलाइन लोकल आहे. या लोकलने आता डबेवाल्यांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मुंबईचा डबेवाला हळूहळू कामावर परतेल, डबेवाला ज्या काही आवश्यक काळजी घ्यायची आहे ती सगळी घेईल, मास्क घालेल, सॅनिटायझर बाळगेल, कोरोना काळात जी दक्षता घ्यायची ती घेऊन तो प्रवास करेल असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.    

तसेच पुनश्च हरिओम म्हणणाऱ्या राज्य सरकारला नोकरदारांना घरचं जेवण वेळेत पोहचवणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी असं वाटलं नाही, शेवटी ह्या बांधवानी राजसाहेबांची भेट घेऊन व्यथा मांडली आणि आज डबेवाल्याना रेल्वेने प्रवासाची मुभा दिली असं सांगत मनसेने श्रेय घेतलं आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतली होती राज ठाकरेंची भेट

लोकल सेवा सुरु करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून मुंबई डबेवाला रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. मुंबई हळू हळू पुर्वपदावर येत आहे काही शासकीय, निमशासकीय, कार्पोरेट कार्यालये चालू झाली आहेत ज्या कार्यालयात शक्य आहे तेथे डबेवाले सायकलवर जेवणाचे डबे पोहचवत आहेत. परंतु जोपर्यंत लोकल सेवा बहाल होत नाही तो पर्यंत डबेवाला आपली सेवा पूर्ण क्षमतेने देऊ शकत नाही. एकतरं डब्बेवाल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या किंवा डब्बेवाल्यांना अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून रेल्वेने प्रवास करु द्या. या दोन्ही मागण्यांकडे प्रशासानाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मनसेने जे आंदोलन उभं केले ते मुंबईकरांसाठी होतं, म्हणून त्याला डबेवाला संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचसोबत मुंबई डबेवाला संघटनेच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मनसेच्या वतीने हे प्रश्न सरकारकडे मांडावे अशी विनंती मुंबईच्या डबेवाल्यांनी केली होती. राज ठाकरे यांनीही डबेवाल्यांना मी याबाबत सरकारशी बोलतो असं आश्वासन दिलं होतं.

अनलॉक-४ ची मुदत संपत आल्यानं अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना नेमक्या कधी जाहीर करण्यात येणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर ठाकरे सरकारनं अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करू देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरू लागली होती. अखेर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू होतील.

मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये (एमएमएमआर) केवळ अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादन करण्यास परवानगी होती. मात्र अनलॉक-५ मध्ये हे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं कारखाने आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय आधी सरकारनं घेतला होता. मुंबईतील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सदेखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळून चित्रपटगृहं सुरू करण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे उद्या याबद्दल सकारात्मक निर्णय होऊ शकतो

Web Title: Mumbai Dabbewala raised problem to Raj Thackeray & CM Uddhav Thackeray allowed to travel in local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.