MP Sambhaji Raje Post for remind Shivaji Maharaj order of Help to Farmers for all leaders | “शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज”

“शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज”

ठळक मुद्देकष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे घ्याशिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा, पण आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरजकेंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक -संभाजीराजे

मुंबई  - परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट उभं राहिलंय, अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे काढत आहेत, मात्र या दौऱ्यात दोघंही एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यातही व्यस्त आहे. विरोधी पक्षाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकारने ठोस मदत देण्याची घोषणा अद्यापही केली नाही.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्षावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी एका पोस्टमधून सर्वच नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हटलं आहे. संभाजीराजेंनी पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशाचा दाखलाही दिला आहे. संभाजीराजे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहचवावी. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा, पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या या आदेशात म्हटलंय की, कष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे घ्या, खंडी, दोन खंडी धान्य द्या, दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका, मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल अशा शब्दात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश छत्रपतींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजेंनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली होती. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहे. तर उभी पिके आणि माती सुद्धा वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असे पाहावे. मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला होता.

तसेच कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी हरकत नाही. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळे राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकेल असंही संभाजीराजे म्हणाले होते.

Web Title: MP Sambhaji Raje Post for remind Shivaji Maharaj order of Help to Farmers for all leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.