मनसेचा नवा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये दिसला; मनसैनिकांनी मालकाला चोपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 18:12 IST2020-11-13T18:12:17+5:302020-11-13T18:12:45+5:30
MNS New Flag: जानेवारी महिन्यात राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा लाँच केला होता. झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

मनसेचा नवा झेंडा नॉनव्हेज हॉटेलमध्ये दिसला; मनसैनिकांनी मालकाला चोपला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला नवीन झेंडा एका हॉटेलमध्ये वापरल्याच्या रागातून मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी हॉटेल मालकाला चोपल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) झालेल्या या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तुर्भे येथील हॉटेल बिसमिल्लाहमध्ये ही घटना घडली. बिसमिल्लाहच्या मालकाने हॉटेलमध्ये मनसेचा राजमुद्रा असलेला नवीन झेंडा वापरला होता. हॉटेलमध्ये एका भिंतीवर आधी लावलेले मेनूचे पोस्टर झाकण्यासाठी त्याने राजमुद्रा असलेला मनसेचा झेंडा चिटकवला होता. न्यूज 18 लोकमतने याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
राजमुद्रा असलेला फोटो नॉन व्हेज हॉटेलमध्ये का वापरला? असा सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल चालकाला केला. पण, राजमुद्रा काय आहे याची माहिती नाही, म्हणून झेंडा वापरला, असं हॉटेलचालकाने सांगितले. पण, मनसे कार्यकर्त्यांनी या हॉटेलचालकाला चोप दिला. याचबरोबर हॉटेलचालकाला उठा बश्या काढायला सांगत माफी मागायला लावली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर लावलेला मनसेचा झेंडा काढला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच पुन्हा अशी चूक करणार नाही, असे हॉटेल मालकाकडून कबूल करून घेतले.
जानेवारी महिन्यात राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा लाँच केला होता. झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा कुठेही अवमान होऊ नये, अशी ताकीद कार्यकर्त्यांना दिली होती.