राज ठाकरेंनी १९९३ मध्ये शिवसैनिकाला लिहिलेलं पत्र व्हायरल; विधानसभेवर भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 15:41 IST2020-08-17T15:40:25+5:302020-08-17T15:41:17+5:30
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधी विचारांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा विरोधी बाकांवर बसली आहे.

राज ठाकरेंनी १९९३ मध्ये शिवसैनिकाला लिहिलेलं पत्र व्हायरल; विधानसभेवर भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत...
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा विधानसभेत केवळ १ आमदार असला तरी राजकीय वर्तुळात राज ठाकरेंची बरीच हवा असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा चाहता वर्ग राज्यात आहे. त्यामुळे राज्यातील कोणताही प्रलंबित प्रश्न असला तरी लोक आर्वुजून राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडतात. राज ठाकरेही आपल्या शैलीत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रबळ विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करा असं आवाहन केले होते. निवडणुकीत त्यांचा एक आमदार आला असला तरी अनेक ठिकाणी त्यांच्या मतदानात वाढ झालेली दिसून येते. या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बदलून निघालं आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधी विचारांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा विरोधी बाकांवर बसली आहे.
नेमक्या याच संधीचा फायदा घेत मनसेनेही आपला ट्रॅक बदलत रेल्वे इंजिन हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळवलं आहे. इतकचं नाही तर राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलून भगवा झेंडा केला आहे. यापुढील काळात राज ठाकरे शिवसेनेमुळे निर्माण झालेली हिंदुत्वाची पोकळी भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
हे पत्र आहे १९९३ मधील..प्रतीक नावाच्या कार्यकर्त्याला राज ठाकरेंनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र विधानसभेवर जोपर्यंत आपला प्राणप्राय भगवा झेंडा फडकत नाही, तोपर्यंत आपण शांत बसायचे नाही, तसेच हे राष्ट्र जोपर्यंत हिंदूंचे होत नाही तोपर्यंत आपला लढा चालू ठेवायचा आहे. आई जगदंबा आपणास प्रचंड शक्ती देवो असं सांगत पत्राच्या खाली राज ठाकरेंची स्वाक्षरी आहे.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिल्यापासून या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाकडूनही केला जात आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपाकडून केली जाते. तर दुसरीकडे राज ठाकरेंची आक्रमक शैली हिंदुत्वाच्या बाजुने झुकत असल्याने आगामी काळात भाजपा-मनसे यांची जवळीक वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.