मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:10 PM2021-07-05T16:10:21+5:302021-07-05T16:12:00+5:30

"विरोधी पक्षाचे सदस्य आत घुसले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. भास्कर जाधव म्हणून नव्हे, तर पीठासीन अधिकारी म्हणून हा खूप मोठा अपमान आहे"

mla Bhaskar jadhav slams bjp mla over chaos in Assembly Monsoon session | मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

Next

राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. विरोधी पक्षाचे सदस्य आत घुसले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. भास्कर जाधव म्हणून नव्हे, तर पीठासीन अधिकारी म्हणून हा खूप मोठा अपमान आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर असं कधी घडलं नाही. माझ्यासाठी आजचा दिवस काळा दिवस आहे, असं म्हणत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन; तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरील चर्चेदरम्यान झालेल्या राड्याचा तपशील देताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजप सदस्यांवर शेलक्या शब्दांत ताशेरे ओढले. "महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही. सभागृहात ताणतणाव होत असतात. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. पण यावेळी विरोधकांनी मर्यादा ओलांडली. विरोधकांचा गोंधळ सुरू होता. त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. हे आमदार घुसले तर घुसले ते गावगुंडाप्रमाणे अंगावर तुटून पडले. त्यावेळी मीही त्यांना म्हटलं की तुम्ही ६०-७० जण आलात तरी मी एकटा इथं उभा आहे. तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू असं विरोधी पक्षनेत्यांना मी सांगितलं, पण तेही ऐकायला तयार नव्हते", असं भास्कर जाधव म्हणाले. 

मी खोटा असेन तर मीही शिक्षा भोगेन
"मी शिवीगाळ केली अशी खोटी माहिती माध्यमांना दिली गेली असं मला कळालं आहे. पण मी जर एकही असंसदीय शब्द बोललो किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे. तुम्हाला जी शिक्षा होईल ती मीही घेईन. मी आक्रमक आहे. पण कधीच असंसदीय शब्दप्रयोग केलेला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे. ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत", असे आदेश भास्कर जाधव यांनी यावेळी दिले. 

गोंधळ घालणाऱ्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

निलंबन झालेल्या आमदारांची नावे-

१. संजय कुटे
२. आशिष शेलार
३. गिरीश महाजन
४. पराग अळवणी
५. राम सातपुते
६. अतुल भातखळकर
७. जयकुमार रावल
८. हरीश पिंपळे
९. योगेश सागर
१०. नारायण कुचे
११. कीर्तीकुमार (बंटी) बागडिया
१२. अभिमन्यू पवार

Web Title: mla Bhaskar jadhav slams bjp mla over chaos in Assembly Monsoon session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.