मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; पवारांसमोर आशिष शेलारांनी केलेल्या विधानानं चर्चेला उधाण

By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 05:33 PM2020-11-20T17:33:08+5:302020-11-20T17:35:55+5:30

भाजप आमदार आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा

Maratha women should become cm says bjp leader Ashish Shelar | मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; पवारांसमोर आशिष शेलारांनी केलेल्या विधानानं चर्चेला उधाण

मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी; पवारांसमोर आशिष शेलारांनी केलेल्या विधानानं चर्चेला उधाण

Next

मुंबई: मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री व्हावी, असं विधान भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शेलार यांनी हे विधान केल्यानं याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत असताना शेलार यांनी केलेल्या विधानानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. 'मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,' असं शेलार म्हणाले.

भाजपकडून 'मिशन मुंबई'ची तयारी; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करणाऱ्या भातखळकरांवर मोठी जबाबदारी

आशिष शेलार यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेलार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेकांनी शेलार यांच्या विधानाचा संदर्भ भाजपमध्ये सुरू असलेल्या ताज्या घडामोडींशी जोडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. या निवडणुकीच्या प्रभारीपदी आमदार अतुल भातखळकर यांची नेमणूक करण्यात आली. या बैठकीला शेलार अनुपस्थित होते.

२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आशिष शेलारांच्या खांद्यावर होती. त्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेनं ८४, तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे त्याआधीच्या निवडणुकीत भाजपच्या जागा केवळ ३१ होत्या. शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं अतिशय घवघवीत यश मिळवलं. मात्र यंदा त्यांच्याकडे मुंबईऐवजी ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Web Title: Maratha women should become cm says bjp leader Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.