विदर्भवाद्यांना विधानसभेचे वेध; दिग्गजांना घाम फोडणार की 'डिपॉझिट'ही जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 05:04 PM2019-08-20T17:04:12+5:302019-08-20T17:07:14+5:30

एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2019: Separate Vidarbha supporters are getting ready for Assembly Election | विदर्भवाद्यांना विधानसभेचे वेध; दिग्गजांना घाम फोडणार की 'डिपॉझिट'ही जाणार?

विदर्भवाद्यांना विधानसभेचे वेध; दिग्गजांना घाम फोडणार की 'डिपॉझिट'ही जाणार?

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीत सातही जागांवर विदर्भवादी उमेदवारांची जमानत जप्त झाली. विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ पैकी ४० जागांवर लढण्याची त्यांची तयारी आहे.विदर्भाचे आंदोलन भरकटले असल्याने विदर्भवाद्यांना हवे तसे जनसमर्थन मिळालेले नाही.

>> योगेश पांडे, नागपूर

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्यावर चर्चांना जरी ऊत येत असला तरी निवडणुकांच्या आखाड्यात त्याला फारसे स्थान नसल्याचे दिसून येते. मागील काही निवडणुकांत विदर्भवाद्यांच्या पदरी निराशाच आल्याचे आकडेवारीतून दिसून येते. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी विदर्भवादी एकत्रित आले आहेत. आता विदर्भवादी मोठ्या पक्षांना घाम फोडतात की प्रचारासाठी कार्यकर्ते जमविताना त्यांनाच घाम फुटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

लोकसभा निवडणुकांत विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येत विदर्भ राज्य निर्माण महामंच स्थापन केला. विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी, आरपीआय खोब्रागडे, लोकजागर पार्टी, शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष यासारख्या विदर्भवादी राजकीय संघटनांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र निकालांत मंचच्या उमेदवारांचे कुठेच अस्तित्वही जाणवले नाही. सातही जागांवरील उमेदवारांची जमानत जप्त झाली. एकेकाळी ज्या भूमीत विदर्भाच्या नावावर उमेदवार विजयी झाले होते, तेथे विदर्भवाद्यांचा प्रभावच राहिला नसल्याचे चित्र निकालांतून समोर आले.

आता विधानसभेसाठी परत विदर्भवादी सरसावले आहेत. विदर्भात ६२ पैकी ४० जागांवर लढण्याची त्यांची तयारी आहे. मागील काही काळापासून विदर्भाचे आंदोलन भरकटले असल्याने विदर्भवाद्यांना हवे तसे जनसमर्थन मिळालेले नाही. आता 'सबकुछ ऑनलाईनटच्या जमान्यात 'सोशल मीडिया'वरच हे आंदोलन दिसून येते व रस्त्यांवरही ठराविक व मोजकेच चेहरे दिसून येतात. आता विधानसभा निवडणुकांत प्रचारासाठी कार्यकर्ते आणायचे कुठून, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे. परंतु 'गिरेंगे..पर फिर लडेंगे' ही त्यांची जिद्द कायम आहे. आता जिद्दीतून खरोखर मतं खेचून आणण्यात त्यांना यश मिळते की अपयशाच्या यादीत आणखी एका निवडणुकीचा समावेश होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

कुणीही गाठला नाही १ टक्का

लोकसभेत विदर्भातील सातही जागांवरील निकालांत विदर्भ राज्य निर्माण महामंचच्या उमेदवारांची जमानत जप्त झाली. हा महामंच तयार करण्यात पुढाकार घेणाऱ्यांपैकी असलेले अ‍ॅड.सुरेश माने यांना नागपुरातून केवळ ०.२९ टक्के मतं मिळाली, तर ज्ञानेश वाकुडकर यांच्या वाट्याला अवघी ०.११ टक्के मतं आली. चंद्रपूर येथील उमेदवार दशरथ मडावी यांना सर्वाधिक ०.२५ टक्के मतं मिळाली.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2019: Separate Vidarbha supporters are getting ready for Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.