काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 00:54 IST2025-05-15T00:54:09+5:302025-05-15T00:54:34+5:30
Maharashtra Politics: राज्यात दोन नवी समीकरणे जुळण्याची शक्यता असून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
राज्यात दोन नवी समीकरणे जुळण्याची शक्यता असून शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात दोन्ही पक्ष एकत्र आले तर ते आश्चर्यकारक ठरणार नाही, असे म्हटले होते. शरद पवार यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना एकत्र येऊन चर्चा करण्यास सांगितले होते. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उत्साहित झाले. परंतु, राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र आले तर राजकारणात नवी समीकरणे तयार होऊ शकतात, अशी चिंता महाविकास आघाडीतील नेत्यांना वाटत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत त्यांचे नुकसान होऊ शकते.
नुकतीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईतील त्यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची राज्य समितीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड आणि सर्व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. ही बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाबाबात फक्त शरद पवारच बोलतील, असे पक्षातील नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत सुधारणा करण्यासाठी आणि निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्यासाठी एक व्यापक रोडमॅप मांडला. त्यांनी पुनर्रचनेच्या तातडीच्या गरजेवर भर दिला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि संघटना अधिक चपळ आणि प्रतिसादशील बनवण्यासाठी नवीन नियुक्त्यांचे संकेत दिले.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. शरद पवारांच्या पक्षाने राज्यव्यापी संपर्क दौरे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते महाराष्ट्रभर प्रवास करून नागरिकांशी संवाद साधतील, त्यांच्या तक्रारी ऐकतील. शेतकरी, बेरोजगारी आणि राज्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.