Maharashtra Budget 2021: भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 04:26 PM2021-03-08T16:26:43+5:302021-03-08T16:27:16+5:30

Maharashtra Budget 2021: पत्रकारांशी संवाद साधण्यापूर्वी भाजपच्या आमदारांची घोषणाबाजी; फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू

Maharashtra Budget 2021 bjp leader devendra fadnavis smiles after bjp mlas gives slogans about baramati | Maharashtra Budget 2021: भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावर

Maharashtra Budget 2021: भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावर

Next

मुंबई: अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरसंधान साधलं आहे. केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही. केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा. मात्र इतर वेळी केंद्रावर टीका करायची, हेच महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. अर्थसंकल्पात याचाच प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्प राज्याचा की केवळ काही भागांपुरता?; फडणवीसांचा ठाकरे सरकारच्या बजेटवर निशाणा

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर, त्यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपल्यावर भाजपचे आमदार विधिमंडळात बाहेर पडले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारण्यासाठी पत्रकार उपस्थित होते. प्रश्नोत्तराला सुरुवात होण्यापूर्वी भाजप आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा धिक्कार असो, पुणे-बारामतीसाठी अर्थसंकल्प मांडणाऱ्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी आमदारांनी केली. भाजप आमदारांनी थेटपणे बारामतीचा आणि अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा उल्लेख केल्यानंतर फडणवीसांना हसू अनावर झालं.

आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; 'या' चार जिल्ह्यांसाठी मोठी घोषणा

केंद्राकडून महाराष्ट्राला साडे चौदा हजार कोटी रुपये यायचं आहे. केंद्रानं राज्याच्या वाट्याचा महसूल थकवला आहे. मात्र त्याबद्दल कोणतंही रडगाणं न गाता महाविकास आघाडी सरकार वाटचाल करत असल्याचं अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडताना म्हणाले. त्यावर साडे चौदा हजार कोटी शिल्लक असल्याचं सांगतात. पण ३ लाख कोटी रुपये दिल्याचं सांगत नाहीत, असा टोला फडणवीसांनी लगावला. 

"महाराष्ट्र संकटापुढे कधीही झुकला नाही"; सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद 

महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प म्हणावं की काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प म्हणावं, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. अजित पवारांनी केलेल्या घोषणांमध्ये बरेचसे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत. यातले काही प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीनं प्रगतीपथावर आहेत. त्यात अनेक रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. एका बाजूला केंद्राला नावं ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख स्वत:च्या अर्थसंकल्पात करायचा, अशी सोयीस्कर भूमिका राज्य सरकार घेत असल्याचं फडणवीस म्हणाले.

राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात एकाही पैशाची तरतूद नाही. मूळ कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत अर्थसंकल्पात नाही. सोयाबीन, कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी ठरली आहे. वीज बिलासंदर्भातही सरकारनं कोणताही दिलासा जनतेला दिलेला नाही. पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळे आता केंद्राकडे बोट दाखवण्याचा कोणताही अधिकार त्यांनी राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: Maharashtra Budget 2021 bjp leader devendra fadnavis smiles after bjp mlas gives slogans about baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.