पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 23 जागा जिंकणारच, ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचा हुंकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 15:43 IST2019-03-29T15:36:43+5:302019-03-29T15:43:05+5:30
लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे, तस तशा राजकीय चढाओढ वाढत चालली आहे.

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 23 जागा जिंकणारच, ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांचा हुंकार
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे, तस तशा राजकीय चढाओढ वाढत चालल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाहसुद्धा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जनसभेला संबोधित करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर सरळ निशाणा साधला आहे. ममता सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, त्यामुळे पश्चिम बंगालची संस्कृती नष्ट होत चालली आहे. ही निवडणूक पश्चिम बंगालची अस्तित्वाची निवडणूक आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा लोकसभेच्या 23 जागा जिंकणारच, असा निर्धारही अमित शाह यांनी बोलून दाखवला आहे. पश्चिम पंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत, त्यातील 23 जागांवर विजय मिळवण्याचं भाजपाचं लक्ष्य असल्याचंही अमित शाह म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019ची निवडणूक लढवावी,' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पण जर मोदी बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. जनतेच्या न्यायालयात त्यांना दंडित केले जाईल' असे ममता बॅनर्जी यांनी मोदींविषयी प्रश्न विचारल्यावर म्हटलं होते.
'मला माहीत आहे की, त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच 42 जागांवरुन निवडणूक लढवावी' असं ही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 'बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. त्यांनी येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईन' असा टोलाही त्यांनी लगावला होता.