lok sabha election 2019 Rahul Gandhi Slams Pm Modi For His Jibe On Rajiv Gandhi | ...तरीही तुम्ही वाचू शकणार नाही; राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

...तरीही तुम्ही वाचू शकणार नाही; राजीव गांधींवरील मोदींच्या टीकेला राहुल गांधींचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही वाचू शकणार नाहीत, असं ट्विट करत राहुल यांनी मोदींवर पलटवार केला. मोदींनी काल एका जनसभेला संबोधित करताना राजीव गांधींचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. 

'मोदीजी, लढाई संपली आहे. तुमची कर्म तुमची वाट पाहत आहेत. माझ्या वडिलांवर आरोप करुन तुम्ही वाचू शकणार नाही,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी प्रचारसभेत बोलताना बोफोर्स घोटाळ्यावरुन राजीव गांधींवर निशाणा साधला होता. 'तुमच्या (राहुल गांधींच्या) वडिलांना त्यांच्या राज दरबारातील लोकांनी मोठा गाजावाजा करत मिस्टर क्लीन म्हटलं होतं. मात्र हळूहळू भ्रष्टाचारी नंबर वनच्या रुपात त्यांचं आयुष्य संपलं. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुकीला क्षमा करतो. मात्र फसवणूक करणाऱ्याला कधीही माफ करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी राजीव गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली होती. 
राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांनीदेखील पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली. 'मोदी काल राजीव गांधींबद्दल जे बोलले, त्यामुळे आम्हाला वेदना झाल्या. साधारणपणे पंतप्रधान देशाच्या लोकांसाठी बोलतात. ही एक मोठी जबाबदारी आहे. पंतप्रधान अद्वातद्वा बोलू शकत नाही. मात्र काल पंतप्रधान राहुल गांधींना तुमचे वडील निधनावेळी एक नंबरचे भ्रष्ट होते असं म्हणाले. मोदींच्या या विधानाची आम्हाला लाज वाटते,' अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. 

Web Title: lok sabha election 2019 Rahul Gandhi Slams Pm Modi For His Jibe On Rajiv Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.